नसरापूर : बावीस लाखांची चोरी; तिघांना अटक | पुढारी

नसरापूर : बावीस लाखांची चोरी; तिघांना अटक

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटककडे जात असलेली खासगी बस एका हॉटेलमध्ये चहा, नाष्ट्यासाठी थांबली असता बसमधील बॅगेतून 22 लाखांची रोकडची चोरी झाली होती. याप्रकरणी राजगड पोलिसांनी सोमवारी (दि. 20) तिघांना अटक केली. चोरीतील मुद्देमाल मात्र मिळाला नाही. बसचा चालक नागेश रामा पुजारी (वय 37, रा. कुंदापूर, जि. उडपी), रियास बाबूसहाब बेठगिरी (वय 49, रा. हुबळी, जि. धारवाड), सुरेश शेषा पुजारी (वय 40, रा. कोडगू) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ही घटना पुणे – सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) येथील एका हॉटेलसमोर दि. 7 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजेंद्र पवार (रा. मेंगलोर, कर्नाटक) यांनी ट्रॅव्हल बस (केए 19 एडी 0966) मधील तिघांविरुद्ध फिर्याद दिली होती. दरम्यान, सोने खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणारे राजेंद्र पवार यांनी मुंबईमध्ये होणार्‍या लिलावातील सोने खरेदीसाठी त्यांचा कामगार स्वरूप सिंगला मेंगलोरहून रोख 22 लाख रुपये घेऊन पाठविले होते. लिलाव न निघाल्यामुळे कामगार मुंबई येथून बसने प्रवास करीत असताना सारोळे येथे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये गाडी थांबली होती. या वेळी रोकडची चोरी झाली. प्राथमिक संशयावरून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.

Back to top button