पिंपरी : वातावरण बदलाने व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत वाढ

पिंपरी : वातावरण बदलाने व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत वाढ

दीपेश सुराणा

पिंपरी : पहाटे जाणवणारी थंडी, दुपारी पडणारे कडक ऊन आणि रात्रीचा उकाडा अशा तापमान बदलामुळे विषाणूजन्य संसर्गाचे (व्हायरल इन्फेक्शन) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 25 ते 30 टक्क्यांपर्यंत रुग्णसंख्या वाढली आहे. याचवरोबर वातावरणातील प्रदूषण, धूळ हे घटकदेखील आजारपणाचे कारण ठरत आहेत. घसा दुखणे, सर्दी आणि काही प्रमाणात तापाचे रुग्ण आढळत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक जाणवत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील माहितीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथे 18.1 अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदविले गेले. तर, 35.5 अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविले. 15 फेब्रुवारी रोजी 16.4 अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदविले गेले. शनिवारी (दि. 18) 18.6 अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर, 36 अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडाभराचा अंदाज पाहता कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांत घसा दुखीचे रुग्ण जास्त
पालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात सध्या दिवसाला 550 ते 900 इतके रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने, सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आदी रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने घसादुखीचे रुग्ण जास्त आढळत आहेत. त्यापाठोपाठ सर्दी आणि काही प्रमाणात तापाचे रूग्ण दररोज तपासणीसाठी डॉक्टरांकडे येत आहेत. कोरोना व अन्य संसर्गजन्य आजार झालेल्या रुग्णांमध्ये विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण जास्त आहे.

काय काळजी घ्याल ?
संतुलित आणि समतोल आहार घ्यावा
पुरेशी झोप, व्यायाम यावर भर द्यावा
भरपूर पाणी प्यावे. हात सतत धुणे गरजेचे
गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी
तिखट, चमचमीत आणि मसाल्याचे पदार्थ टाळावेत
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात
रात्री झोपताना हळददूध घ्यावे
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा

चिंचवड येथील तापमानाची नोंद (अंश सेल्सियस)

दिनांक किमान कमाल
12 18.1 35.5
13 18.5 34.1
14 17.5 34.1
15 16.4 35.4
16 18 35.9
17 18.3 36.1
18 18.6 36

व्हायरल इन्फेक्शनला प्रतिबंध करण्यासाठी समतोल आहार, योग्य व्यायाम आणि चांगली झोप घ्यायला हवी. त्याचप्रमाणे, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पूरक पदार्थांचा आहारात समावेश करावा.
                                                      – डॉ. लक्ष्मण गोफणे,
                               सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

व्हायरल इन्फेक्शन होणार्‍या रुग्णांची संख्या सध्या 25 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घसादुखीचे रुग्ण जास्त आहेत. त्या खालोखाल सर्दीचे रुग्ण आढळत आहे. तर, काही प्रमाणात तापाचे रुग्ण आहेत. कोरोना व अन्य संसर्गजन्य आजार होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण जास्त आहे.

                                   – डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news