पिंपरी : स्त्री अत्याचारात वाढतोय वृद्धांचा सहभाग | पुढारी

पिंपरी : स्त्री अत्याचारात वाढतोय वृद्धांचा सहभाग

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्त्री अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. दरम्यान, अलीकडे काही प्रकरणांमध्ये वयाची साठी ओलांडलेल्या वृद्धांनी चिमुरड्या मुलींशी अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे म्हातारचळ लागलेली ही वृद्ध मंडळीदेखील पोलिसांची नवी डोकेदुखी ठरत आहेत.

पिंपरी- चिंचवड शहरात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील एका महिन्यात शहर परिसरात 46 महिलांचे विनयभंगाच्या घटना घडल्या, तर 18 महिलांवर बलात्कार झाल्याचे पोलिस दप्तरी नोंद आहे. या वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांचे स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मात्र , सध्यादेखील उद्योग नगरीत ‘स्त्री’ असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. अशातच दरम्यानच्या काळात काही प्रकरणांमध्ये वयाची साठी ओलांडलेल्या वृद्धांचादेखील स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. नातीच्या वयाच्या मुलीसोबत वृद्धांनी घाणेरडे प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवकांचे समुपदेशन करण्यासोबतच ‘साठी बुद्धी नाठी’ झालेल्या वृद्धांना शिस्त लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दुर्धर आजारांमुळे पोलिसांना मर्यादा
वय जास्त असलेल्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्याशी सलोख्यानेच वागावे लागते. कारण बहुतांश आरोपींना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेले असतात. त्यामुळे अन्य आरोपींसारखे या वृद्धांना पोलिसी खाक्या दाखवणे शक्य होत नसल्याचे तपास अधिकारी खासगीत सांगतात.

उदा.
बारा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी प्रदीप रघुनाथ चव्हाण (60) या वृद्धास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पीडितेवर वेळोवेळी नजर ठेवून तिचा पाठलाग केला. तसेच, तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्व वयोगटांतील पुरुषांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे लहान मुली पार्किंग तसेच परिसरात खेळत असताना पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मुलींना ‘गुड’ तसेच ‘बॅड’ टचबाबत अवगत करावे. पालकांनी मुलींशी मनमोकळा संवाद ठेवावा, ज्यामुळे मुली तक्रार करण्यास घाबरणार नाहीत.
            – संगीता गोडे, उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी, वाकड पोलिस ठाणे.

Back to top button