पुणे : शाळाबाह्य मूल्यमापनासाठी केवळ 490 रुपये! | पुढारी

पुणे : शाळाबाह्य मूल्यमापनासाठी केवळ 490 रुपये!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा, यासाठी शाळासिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानुसार शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत होते, परंतु उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळांचे बाह्य मूल्यमापन झाले नव्हते. आता राज्यातील 11 हजार 851 शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे. परंतु, प्रत्येक शाळेचे मूल्यमापन करणार्‍या निर्धारकाला केवळ 490 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर निर्धारक शाळांचे मूल्यमापन कसे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समग्र शिक्षाअंतर्गत शाळासिद्धी उपक्रमअंतर्गत (2020-21 या वर्षातील) स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या प्राथमिक स्तरावरील 10 हजार आणि माध्यमिक स्तरावरील 1 हजार 851 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. या शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यासाठी शाळा व निर्धारक निश्चित करावेत. निश्चित केलेल्या निर्धारकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने 24 फेब्रुवारीला ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करून शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी प्रतिशाळा 490 रुपये निधी दिला जाणार असल्याचे विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी स्पष्ट केले आहे.

सन 2020-21 वर्षातील स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांची निवड करावी. इयत्ता 1 ली ते 5 वी, इयत्ता 1 ली ते 8 वी, 1ली ते 10 वी, इयत्ता 5 वी ते 10 वी अशा शाळा घेण्यात याव्यात. इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र असलेल्या शाळा निवडू नयेत. निर्धारक म्हणून काम करण्यास इछुक असलेल्या व्यक्तीस शाळासिद्धी उपक्रमाची माहिती असावी.

दहावी-बारावी परीक्षेच्या कामात व्यस्त असलेले मनुष्यबळ निवडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी, विषयतज्ज्ञ, विशेषतज्ज्ञ, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांची निर्धारक म्हणून नियुक्ती करावी, असे कळविण्यात आले आहे, परंतु बाह्य मूल्यमापनासाठी केवळ 490 रुपये देण्यात येणार असल्यामुळे बाह्य मूल्यमापनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बाह्य मूल्यमापनाचे वेळापत्रक
शाळा निश्चिती – 17 फेब्रुवारी
निर्धारक निश्चिती – 22 फेब्रुवारी
निर्धारक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप – 23 फेब्रुवारी
निर्धारक व शाळा यांची जोडी – 23 फेब्रुवारी
निर्धारक प्रशिक्षण ऑनलाइन – 24 फेब्रुवारी
बाह्य मूल्यमापन व माहिती अपलोड करणे – 27 फेब्रुवारी ते 15 मार्च
आर्थिक बाबी – 31 मार्चपर्यंत

Back to top button