पुणे : बलात्काराची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षकाची धमकी | पुढारी

पुणे : बलात्काराची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षकाची धमकी

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल केलेली केस मागे घे, नाही तर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एका 50 वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चंद्रकांत भगवान माने (वय 53, रा. विजापूर रोड, सोलापूर) या सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

माने हा सध्या सोलापूर येथील केगाव प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील कॅन्टिन परिसरात घडली. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चंद्रकांत माने हा पुण्यात असताना त्याची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती. त्यातून त्याने त्यांच्यावर बलात्कार केला होता. याबाबत फिर्यादी यांनी 2020 मध्ये समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तसेच सोलापूर शहर पोलिस दलातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्याविरोधात चंद्रकांत माने याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चंद्रकांत माने याने 17 फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना फोन करून शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील कॅन्टिनमध्ये बोलावून घेतले. त्या तेथे पोहोचल्यावर त्याने फिर्याद मागे घे, नाहीतर तुला खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक साळवे तपास करीत आहेत.

Back to top button