पुणे : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण; कुटुंबीयांना दिली ठार मारण्याची धमकी | पुढारी

पुणे : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण; कुटुंबीयांना दिली ठार मारण्याची धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून स्वारगेट येथील जेधे चौकातून दोघांनी तरुणीसह तिच्या बहिणीचे चारचाकी गाडीतून अपहरण केले. त्यानंतर लग्न नाही केले, तर तरुणी व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. रात्रभर दोघींना फिरवून सकाळी सदाशिव पेठेत सोडून दिले. ही घटना 18 ते 19 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सोमनाथ सुनील सूळ (वय 25), गणेश बापूराव महानवर (वय 30, दोघे रा. केसनंद फाटा, वाघोली) या दोघांना अटक केली आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग, अपहरण, जिवे ठार मारण्याची धमकी, अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी सोमनाथ हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे असून, एकाच गावातील आहेत. पूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र, सोमनाथ याच्या स्वभावावरून दोघांचे पटले नाही. त्यांच्यात सतत वाद होत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. दरम्यानच्या कालावधीत तरुणीचे लग्न झाले. काही दिवसांनंतर तिचा घटस्फोट झाला. तरुणी पूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. सध्या ती खासगी नोकरी करते.

सोमनाथ हा तिच्यासोबत संपर्क करून लग्न करण्यासाठी धमकावत होता. तो तिच्या शोधासाठी थेट तिच्या कंपनीत एकेदिवशी गेला. कंपनीतील लोकांनी फिर्यादी तरुणीच्या फोनवर संपर्क करून एक व्यक्ती भेटण्यासाठी आल्याचे कळविले. त्यानंतर तरुणीने तो घरी येऊ नये म्हणून तीच त्याला स्वारगेट येथील जेधे चौकात भेटण्यासाठी लहान बहिणीसोबत शनिवारी (दि. 18) रात्री पावणेदहाच्या सुमारास आली होती.

या वेळी सोमनाथने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने दोघींचे चारचाकी गाडीतून अपहरण केले. तेथून त्यांना वाघोली, जेजुरी असे फिरवून दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास सदाशिव पेठेत सोडले. या वेळी तरुणीने त्याच्यासोबत लग्न केले नाही, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण करीत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक जमदाडे तपास करीत आहेत.

Back to top button