पुणे : सायबर चोरट्यांनी बँक मॅनेजरलाच घातला गंडा | पुढारी

पुणे : सायबर चोरट्यांनी बँक मॅनेजरलाच घातला गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅक्सिस बँकेच्या मॅनेजरलाच सायबर चोरट्यांनी आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यूपीआय चालत नसल्याने अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून सर्च केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एक अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या मोबाईलचा रिमोट अ‍ॅक्सेस स्वत:कडे घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 42 हजार 730 रुपये काढून घेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्सिस बँक मॅनेजरचा यूपीआय चालत नसल्यामुळे त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगलवरून सर्च केला. त्या नंबरवर कॉल केल्यावर समोरील व्यक्तीने कॉल बॅक येईल असे सांगून दुसर्‍या क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना रष्टडेस्क हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले.

त्याद्वारे सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईलचा रिमोट अ‍ॅक्सेस घेतला. त्यानंतर अ‍ॅक्सिस बँक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाऊन सर्व्हिसमधील अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवर क्लिक करण्यास सांगितले. त्यामध्ये फिर्यादीला त्याचा मोबाईल नंबर हा कोड असल्याचे भासवून तो मोबाईल नंबर टाकायला सांगितला.

त्याने यूपीआय जनरेट होत असल्याचे सांगून फिर्यादीचे डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगितले. त्यांना एका कोड डायल पॅड टाईप करायला लावला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीस डेबिट मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यात त्यांच्या डेबिट व क्रेडिट कार्डवरून एकूण 1 लाख 42 हजार 730 रुपये काढण्यात आले. दत्तवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button