कसबा पेठेत प्रचाराचा ‘सुपरमंडे’! अर्धा ते एक किलोमीटर परिसरात दिग्गज एकाच वेळी रस्त्यावर | पुढारी

 कसबा पेठेत प्रचाराचा ‘सुपरमंडे’! अर्धा ते एक किलोमीटर परिसरात दिग्गज एकाच वेळी रस्त्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पंकजा मुंडे, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते कसबा पेठ मतदारसंघातील प्रचारासाठी सोमवारी एकाच वेळी रस्त्यावर उतरले. त्यामुळे या पोटनिवडणुकीचे वातावरण तापले. मतदारसंघाच्या पूर्व भागांतील पेठांवरच दोन्ही बाजूच्या पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले.

कसबा पेठेतील अवघ्या अर्धा-एक किलोमीटरच्या परिसरात प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते सोमवारी सायंकाळी एकाच वेळी प्रचाराला उतरले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचा फडके हौदालगतच्या आरसीएम गुजराथी हायस्कूलमध्ये मेळावा, तर या चौकाच्या अलीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा मेळावा होता.

शनिवारवाड्यापासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांची निघालेली रॅली, तर दुसर्‍या बाजूला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची नाना पेठेतून निघालेली रॅली, त्याच वेळी बाजीराव रस्त्यावरील सरस्वती प्रशालेलगतच्या नातूबाग मैदानात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे हेही प्रचारात उतरले होते.

महाविकास आघाडीने कसबा पेठ पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचाराला उतरले. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. भाजपचा हा पूर्वापार बालेकिल्ला असल्याने, भाजपची सर्व यंत्रणा प्रचाराला लागली आहे. त्यांचे वरिष्ठ नेतेही येथे तळ ठोकून आहेत.

घोषणायुद्धाने वातावरण तापले
शिंदे हे मेळाव्यासाठी शनिवारवाड्यापासून जात होते, तेव्हा तेथे अजित पवार यांच्या रॅलीसाठी मविआचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तेथून फडके हौदाजवळ शिंदे यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

तेथून पवार यांची रॅली जाऊ लागली तेव्हा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणायुद्धाने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. तेथे ध्वनिवर्धक लावलेल्या गाडीवरून शिंदे यांच्या घोषणा सुरू झाल्या. ते बंद करण्यासाठी मविआचे कार्यकर्ते हट्टाला पेटले होते. पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ध्वनिवर्धक बंद करण्यात आले. पवार यांनीही स्वःत चालत पुढे जात दुचाकी रॅली पुढे नेली. सुमारे पंधरा मिनिटे त्या परिसरात घोषणायुद्धाने राजकीय वातावरण तापले होते.

आणखी चार दिवस शिल्लक
पवार यांची रॅली मतदारसंघाच्या सर्व भागांतून फिरली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यरत झाल्याचे दिसून आले. दुसर्‍या बाजूला पंकजा मुंडे यांनीही नाना पेठेसह पूर्व भागातील पेठांमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. दोन्ही बाजूच्या पक्षांचे अनेक आमदार मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, स्थानिक प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबरच अन्य भागातून मतदारसंघात राहण्यास आलेल्या लोकांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराचे आणखी चार दिवस शिल्लक असून, दिवसेंदिवस प्रचाराचा वेग वाढणार असल्याने राजकीय वातावरण आणखी रंगणार आहे.

Back to top button