खासदार अमोल कोल्हे यांच्या आंदोलनाकडे राष्ट्रवादीची पाठ, कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी वाढली | पुढारी

खासदार अमोल कोल्हे यांच्या आंदोलनाकडे राष्ट्रवादीची पाठ, कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी वाढली

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी शिवजयंती महोत्सवाच्या दिवशी केलेल्या आंदोलनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नर तालुक्यातील, शिरूर लोकसभा मतदारसंघातील व राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. कोल्हे यांनीदेखील आंदोलनासाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख टाळल्याने मतदारसंघात कोल्हे यांना एकटे पडले जात असल्याची चर्चा सुरू आहे. तर भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून कोल्हे नेमके काय साध्य करू इच्छितात, या संदर्भातदेखील तर्कवितर्क लावले जात आहेत.

सध्या खा. कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी प्रचंड वाढली असल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यादृष्टीने कोल्हेदेखील सतत भाजपशी जवळीक वाढवत असल्याचे दिसत आहे. परंतु किल्ले शिवनेरीवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी त्यांनी थेट भाजपच्या विरोधात आंदोलन केले. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हे शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले, पण आंदोलन सुरू करताना त्याच्या सोबत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अथवा अन्य एकही पदाधिकारी उपस्थित नव्हते.

तसेच इतर वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही आंदोलन असेल, तर सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकल्या जातात, पक्षाचे नेते विविध माध्यमांमधून पाठिंबा देतात. परंतु या वेळी कोल्हे यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसनेच पाठ फिरवली. किल्ल्यावर उपस्थितीत असलेल्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी स्वागत केले, परंतु कुठेही सोशल मीडियावर कोल्हे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या पोस्ट, फोटो टाकले नाहीत. त्यामुळेच सध्या तरी खासदार डाॅ.अमोल कोल्हे एकटे पडल्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.

Back to top button