पुणे: कसबापेठ निवडणुकीत विजय महाविकास आघाडीचाच होणार: जयंत पाटील | पुढारी

पुणे: कसबापेठ निवडणुकीत विजय महाविकास आघाडीचाच होणार: जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन: पुण्यातील चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आज सोमवारी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतली. या सभेत कसबा पेठची निवडणूक ही भाजपच्या हातातून गेली आहे, म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दररोज इकडे येत आहे. कसब्यातील जनताच भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे जिकडे तिकडेच जनता जाईल. पक्ष, चिन्ह यापेक्षा त्यांचं काम मोठं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. जे लोकं पक्ष चोरून घेऊन गेले आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल. शिवसेना पक्ष बाळासाहेब यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता, आता तो तिसऱ्याने चोरून नेला आहे, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

या सभेत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार सक्षम आहे. सर्वजण एकत्रित काम करत आहेत. याची भाजपला भीती वाटत असल्याने आमदार, मंत्री, गृहमंत्री प्रचाराला येत आहेत. शिवसेनेबाबतचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. शिवसेनेबाबत कोर्ट योग्य तो निर्णय घेईल, असं यावेळी थोरात म्हणाले.

Back to top button