

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात रसदार फळांना मागणी वाढली आहे. बाजारात कलिंगड, खरबूज, द्राक्षे आदी रसदार फळांची आवक वाढली असून, त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, कलिंगड, खरबूजाच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोलापूरच्या बोरांचा हंगाम संपल्याने बाजारात उमराण व चमेलीची आवक ठप्प झाली आहे. चेकनट व चण्यामण्या बोरांची रविवारी अवघ्या दोन ते तीन पोत्यांमधून आवक झाली. त्याला मागणी चांगली राहिल्याने त्याच्या दरात दहा टकक्यांनी वाढ झाली. मागणी अभावी पपईच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांनी घसरण झाली आहे.
उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून आहेत. रविवारी (दि. 19) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 30 टन, मोसंबी 40 ते 50 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार ते दोन हजार गोणी, पेरू 300 ते 400 क्रेटस, कलिंगड 30 ते 40 गाड्या, खरबुज 20 ते 25 गाड्या, बोरे 2 ते 3 पोती इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 400-1200, अननस : 100-500, मोसंबी : (3 डझन) : 200-400, (4 डझन) : 40-160, संत्रा : (10 किलो) : 200-700, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 80-200, गणेश : 10-40, आरक्ता 20-80. कलिंगड : 5-10, खरबूज : 10-25, पपई : 5-20, पेरू (20 किलो) : 400-500, चिक्कू (10 किलो) : 100-550, बोरे (10 किलो) : चेकनट : 1000-1200, चण्यामण्या : 700-800. द्राक्षे (10 किलो) : सुपर सोनाका : 500-600, सोनाका : 450-550, माणिकचमन : 300-450, जम्बो : 500-800, शरद : 450-600.