पुणे : 38 हजार हेक्टरवर फळबाग; मनरेगाच्या उद्दिष्टाच्या 65 टक्के क्षेत्रावरील लागवड | पुढारी

पुणे : 38 हजार हेक्टरवर फळबाग; मनरेगाच्या उद्दिष्टाच्या 65 टक्के क्षेत्रावरील लागवड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चालू वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 60 हजार हेक्टरवर फळझाडे लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी फेब्रुवारी महिन्यात आत्तापर्यंत सुमारे 38 हजार 946 हेक्टरवर म्हणजे सुमारे 65 टक्के क्षेत्रावर फळझाडे लागवड पूर्ण झालेली असून लक्षांकाएवढ्या क्षेत्रावरील उद्दिष्ट निश्चित पूर्ण होण्याची अपेक्षा कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी वर्तविली.

ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता आहे, अशा शेतकर्‍यांकडून मनरेगातील फळझाडे लागवडीस मागणी होत आहे. त्यासाठी कृषी विभागाने क्षेत्रिय स्तरापर्यंत केलेले विस्ताराचे कार्य आणि त्यास शेतकर्‍यांमधून मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दोन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मनरेगातून फळझाडे लागवडीत नाशिक 2 हजार 136 हेक्टर, पुणे 2 हजार 117 हेक्टर आणि पालघर 2 हजार 102 हेक्टरइतकी सर्वाधिक लागवड करून आघाडी घेतल्याचे मोते यांनी सांगितले.

जिल्हानिहाय झालेली फळझाडे लागवड हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. ः ठाणे 1080, पालघर 2102, रायगड 1998, रत्नागिरी 1799, सिंधुदुर्ग 1659, नाशिक 2136, धुळे 752, नंदुरबार 1569, जळगाव 1288, अहमदनगर 1601, पुणे 2117, सोलापूर 1593, सातारा 191, सांगली 679, कोल्हापूर 154, औरंगाबाद 348, जालना 1321, बीड 204, लातूर 1164, उस्मानाबाद 335, नांदेड 240, परभणी 1199, हिंगोली 202 हेक्टरवर फळझाडे लागवड पूर्ण झालेली आहे.

विभागनिहाय स्थिती पाहता अमरावती विभागासाठी 7 हजार 160 हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 6 हजार 532 हेक्टर (91 टक्के) तर नागपूर विभागासाठी 4 हजार 995 हेक्टर उद्दिष्टांपैकी 6 हजार 671 हेक्टरवर म्हणजे सुमारे 133 टक्के क्षेत्रावरील फळझाडे लागवड पूर्ण झाली आहे.

“राज्यात चालूवर्षी असलेल्या पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे फळझाडे लागवडीचे प्रमाण वाढून क्षेत्रात भरीव वाढीची अपेक्षा आहे. मनरेगांतर्गत शेतकर्‍यांकडून प्रामुख्याने आंबा, काजू, डाळिंब, सीताफळ, पेरू, मोसंबी, संत्रा आदी फळझाडे लागवड अधिक झाली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शेतकरी उर्वरित फळझाडे लागवडीसही प्राधान्यक्रम देत आहेत.

       – अशोक किरनल्ली, कृषी सहसंचालक, फलोत्पादन संचालनालय, पुणे.

 

Back to top button