पुणे : खासगी रुग्णालयांचे जाळे विस्तारतेय; एप्रिल ते डिसेंबरमध्ये 43 नव्या रुग्णालयांची नोंदणी | पुढारी

पुणे : खासगी रुग्णालयांचे जाळे विस्तारतेय; एप्रिल ते डिसेंबरमध्ये 43 नव्या रुग्णालयांची नोंदणी

प्रज्ञा केळकर सिंग

पुणे : शहरात सार्वजनिक आरोग्याच्या चांगल्या पायाभूत सुविधा नसतानाही पुणे शहरात खासगी रुग्णालये फोफावत आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत शहरात 43 नवीन खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली, तर पिंपरी-चिंचवड हद्दीत आणखी 33 रुग्णालये जोडली गेली. अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने शहरात खासगी रुग्णालयांचे जाळे विस्तारत आहे.

कोरोना काळात 2020-21 मध्ये पुणे महानगरपालिकेअंतर्गत 29 खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली. त्यापुढील वर्षी 2021-22 मध्ये 45 खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली. डिसेंबर 2022 पर्यंत पुणे महापालिकेकडे 768 खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 31 रुग्णालयांमध्ये 100 पेक्षा जास्त खाटा आहेत, तर इतरांकडे 100 पेक्षा कमी खाटा आहेत.

परवडणारा उपचार खर्च, रुग्णालयांची संख्या, कुशल वैद्यकीय तज्ज्ञांची उपलब्धता, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, पोषक वातावरण आणि नागरी सुविधा पाहता केवळ इतर राज्यांतूनच नव्हे तर परदेशातूनही मुख्यतः मध्य-पूर्वेकडील आणि आफ्रिकन देशांतील रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येत आहेत. वैद्यकीय उपचारांपूर्वी अत्याधुनिक निदानाच्या आधाराची गरज असते. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, साल्मोनेला किंवा लेप्टोस्पायरासारख्या दुर्मीळ तापांचे वेळेवर आणि अचूक निदान करण्यासाठी पुण्यातील पॅथॉलॉजी लॅब अद्ययावत आहेत.

कुठून येतात रुग्ण ?
येमेन
सुदान
अझरबैजान
आर्मेनिया
बेलारूस
कझाकिस्तान
किर्गिस्तान
ताजिकिस्तान
उझबेकिस्तान
बांगलादेश
आफ्रिकन आणि मध्य-पूर्व देश

कोणकोणत्या शस्त्रक्रिया?
जॉइंट आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
ऑन्को शस्त्रक्रिया
ओपन हार्ट सर्जरी
गायनॅक केअर
डोळ्यांच्या शस्त्रक्रिया
गुडघा किंवा हिप रिप्लेसमेंट
कॉस्मेटिक सर्जरी
युरो सर्जरी
एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
न्यूरो सर्जरी
प्रजनन उपचार
अवयव प्रत्यारोपण

पुणे शहर वैद्यकीय पर्यटनासाठी लोकप्रिय होत आहे. अनेक मल्टिस्पेशालिटी किंवा सिंगल स्पेशालिटी, लहान आणि मध्यम रुग्णालये, प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य आणि परवडणार्‍या किमतीसह सक्रियपणे सहभागी होत आहेत. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, गुडघा किंवा हिप रिप्लेसमेंट, कॉस्मेटिक सर्जरी, युरो सर्जरी, एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि बहुतांश प्रकारच्या शस्त्रक्रियांना शहरात जास्त प्रतिसाद मिळतो.

                                                            – डॉ. संजय पाटील,
                                             हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

Back to top button