पुण्याने किमान तापमानात महाबळेश्वरलाही मागे टाकले | पुढारी

पुण्याने किमान तापमानात महाबळेश्वरलाही मागे टाकले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रविवारी सलग दुसर्‍या दिवशी पुणे शहराने थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरलाही मागे टाकले. पुणे शहराचे किमान तापमान 9.4 तर महाबळेश्वरचे 15.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दरम्यान कमाल तापमानात राज्यात रत्नागिरीचे 38.4 अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेले दोन दिवस पुणे शहराचे किमान तापमान 9.4 अंशांवर स्थिर आहे. शनिवार व रविवारीही शहराने राज्यातील नीच्चांकी तापमानात आघाडी घेतली. राज्यात सर्वाधिक थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरचे किमान तापमान 15.4 इतके होते. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय असून त्याचा पहाटे व उत्तर रात्रीच्या तापमानावर परिणाम होत आहे. रात्री ते पहाटेपर्यंत गार वारे उत्तरेकडून येते तर दिवसा पूर्व भागातील उष्ण वारे येत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. आकाश निरभ्र असल्याने दिवसा उष्ण वार्‍याचा प्रभाव तर रात्री थंड वारे येत आहेत.

दोन दिवसांत आणखी उष्णता वाढण्याचा अंदाज
कोकणातील शहरांचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर गेला असून, शनिवारी रत्नागिरी 39.4 अंश तर रविवारी 38.3 अंशांवर गेला होता. आगामी दोन दिवसांत कोकणात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Back to top button