पारगाव : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नागरिकांकडून उपाययोजना | पुढारी

पारगाव : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नागरिकांकडून उपाययोजना

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक, शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट हल्ले टाळण्यासाठी नागरिकांनी आता सुरक्षेचे विविध उपाय करण्यास सुरुवात केली आहे. नागरिक घराभोवती लोखंडी तारेचे कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे बसवू लागले आहेत.

बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांची वाढलेली संख्या व सध्या होत असलेली ऊसतोड यामुळे बिबट्यांचे दर्शन नित्याचे झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांचा परिणाम शेतीच्या कामांवर झाला आहे. उन्हाळ्यात शेतीपिकांना पाणी देणे शेतकर्‍यांसाठी कठीण बनले आहे.

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नागरिक व शेतकर्‍यांनीच विविध उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी घरांभोवताली दहा फूट उंचीचे लोखंडी तारेचे कुंपण तयार करून घेतले आहे. अनेक शेतकर्‍यांनी घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. बिबट्यांचे वाढते हल्ले व वावर वाढल्याने आम्ही घराभोवताली सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. कॅमेर्‍यांची दररोज तपासणी केली असता, बिबटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले हमखास पहायला मिळतात. बिबट्यांमुळे कुत्री पाळणे कठीण झाले आहे. बिबट्यांचे दर्शन आम्हाला नित्याचेच झाले आहे.

Back to top button