पुढारी डिजीटल : शिवसृष्टी' प्रकल्पाचा पहिला चरण आज लोकार्पणासाठी सिद्ध झाला आहे. आज या प्रकल्पाच्या लोकार्पणाला गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्यांनी अनेक दाखले देत शिवाजी महाराज आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन केलं. अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये मध्ये अमित शहा यांनी शिवाचरित्राचे एक पैलू उलगडून दाखवले. आपल्या भाषणात ते म्हणतात, 'या कार्यक्रमाच्या लोकार्पणसाठी आजचा दिवसाइतका सर्वोत्तम दिवस पुन्हा असणार नाही. आजच्या दिवशी महाराजांना कोटी प्रणाम. या कामी आयुष्य वाहून घेणाऱ्या बाबासाहेबांनाही प्रणाम.
जाणता राजाचे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. पंतप्रधान मोदींनी यासाठी आग्रह धरला होता. शिवसृष्टीचं काम हे दैवी कामाप्रमाणे आहे. ही शिवसृष्टी संपूर्ण देशाला आकर्षित करेल. शिवाजी महाराजांची लढाई साम्राज्यवादी नाही तर स्वराज्यवादी आहे. यावेळी त्यांनी 'शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा शोधायला घरापासून लांब जावं लागलं नसतं.' या यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याचा दाखला दिला.' या दरम्यान त्यांनी हिंदी कवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेच्या ओळी वाचून दाखवल्या. अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी या कार्यक्रमाच सूत्रसंचालन केलं. शिवसृष्टीला पूर्ण स्वरूपात येण्यास अजून काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. या प्रोजेक्टचं एकूण बजेट ४३२ कोटी रुपये आहे.