पारगाव : वय 75 अन् 35 वर्षे सायकलस्वारी

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : पारगाव येथील गोरक्षनाथ भाऊ निकम या 75 वर्षे पूर्ण केलेल्या वारकर्याची कीर्तनातील मंत्रमुग्ध करणारी पावले व गेली 35 वर्षांपासून सतत सायकलवरील प्रवास थक्क करणारा आहे. तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही बाब आहे. आंबेगाव तालुक्यात कीर्तन म्हटले की चोपदार, वीणेकरी म्हणून निकम बुवा हेच समीकरण झाले आहे. गोरक्षनाथ भाऊ निकम हे गेली 35 वर्षांपासून वारकरी संप्रदायात आहेत. कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये चोपदार, वीणेकरी म्हणून ते सेवा करतात.
अंगात पांढरे शुभ्र धोतर, नेहरू शर्ट, त्यात कपाळी गंध, ओठांवर भारदस्त पांढर्या मिशा असा पेहराव निकम बुवांचा असतो. विशेष म्हणजे ते कीर्तनामध्ये दिसतातच. गावोगावच्या अखंड हरिनाम सप्ताहांमध्ये त्यांना ग्रामस्थांकडून खास निमंत्रित केले जाते. कीर्तनाच्या कार्यक्रमांना जाताना ते त्यांच्याकडे असलेल्या सायकलनेच प्रवास करतात. नुकतीच त्यांनी वयाची 75 ही पूर्ण केली.
गेली 35 वर्षांपासून मी सायकलवरच प्रवास करत आहे. यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. पैशांचीदेखील चांगली बचत होते. शरीर व आरोग्यदायी जीवनासाठी सायकलचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे.
-गोरक्षनाथ निकम, वारकरी, पारगाव.