नसरापूर : दीड लाख भाविकांनी घेतले बनेश्वरचे दर्शन | पुढारी

नसरापूर : दीड लाख भाविकांनी घेतले बनेश्वरचे दर्शन

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : बनेश्वर येथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीनंतर भाविकांची रांग लागली होती. रात्री एक वाजता तहसीलदार सचिन पाटील आणि ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ यांनी सपत्नीक शासकीय अभिषेक व पूजा केली. मंदिराचे पुजारी सुधीर साळुंखे, कृष्णा पाठक, रवींद्र हरगुडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

या वेळी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, हनुमंत कदम, अनिल गयावळ, आबासाहेब यादव, सतीश वाल्हेकर, प्रकाश जंगम, काशिनाथ पालकर, ज्योती चव्हाण आदी उपस्थित होते. बनेश्वर मंदिराच्या परिसरात खेळणी, खाऊ, पुस्तके, आईस्क्रीम यांची दुकाने सजली होती. नसरापूर येथील अग्निहोत्र मंडळ व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने भाविकांसाठी मोफत ताक व पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.

दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे. केळवडे येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत कोंडे यांनी मंदिराच्या सजावटीसाठी फुले दिली. आकर्षक सजावट शिवभक्त सायली पाटील यांनी केली. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी राजगड पोलिस, होमगार्ड व पोलिस पाटील तैनात करण्यात आले होते. श्री शिवाजी कुलचे विद्यार्थी स्वयंसेवक तसेच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे सुशील विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तैनात होते. वनोद्यानात वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button