पिंपरी : मतदान कर्मचार्‍यांना प्रशिक्षण | पुढारी

पिंपरी : मतदान कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूकविषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे 3 हजार प्रशिक्षणार्थींना दुसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण शनिवारी (दि. 18) देण्यात आले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत पालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षणार्थींना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणाचे एकुण 3 टप्पे करण्यात आले आहे. पहिला टप्पा 12 फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, इव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे आदी उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आज पार पडलेल्या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, मतदान प्रकिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी मॉक पोल घेणे आदींबाबत तसेच मॉक पोलप्रक्रियेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली.

पालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष निवडणूकविषयक कामकाजात आलेले अनुभव सांगितले. सेक्टर अधिकारी किरण अंदूरे यांनी विविध रकान्यांची तपशीलवार माहिती दिली. मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती कशा पध्दतीने भरावी, याचे संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर बाबी स्पष्ट करून सांगितल्या. निवडणूकप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले. मतदारसंघातील मतदार यादीत नावे असलेल्या कर्मचारी अधिकार्‍यांसाठी प्रा. मोरे प्रेक्षागृहात दुसर्‍या प्रशिक्षणाच्या दिवशी मतदान सुविधा कक्ष सुरू करण्यात आला होता. टपाली मतदानासाठी आवश्यक असणारे फॉर्म वितरण आणि स्वीकृतीची सोय येथे करण्यात आली होती.

 

Back to top button