पिंपरी : ‘त्या’ आदेशामुळे चौकीतील चिरीमिरी बंद | पुढारी

पिंपरी : ‘त्या’ आदेशामुळे चौकीतील चिरीमिरी बंद

संतोष शिंदे : 

पिंपरी : प्रभारी अधिकार्‍यांना अंधारात ठेवून चौकी स्तरावर थेट गुन्हे दाखल किंवा ‘बर्किंग’ करण्याचे निर्णय घेतले जात होते. दरम्यान, चौक्यांमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकार्‍यांना प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यातच दाखल होईल, असे आदेश दिले. त्यामुळे चौकी स्तरावरील ‘तोडपाणी’ बंद झाल्याचे बोलले जात आहे.

तक्रारदारांची ससेहोलपट थांबली

चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराचे म्हणणे ऐकून न घेता त्याला माघारी पाठवले जाते. उद्या या, परवा या, असे सांगून टाळाटाळ केली जाते. मात्र, आता तक्रारदार ठाण्यात जावू लागल्याने अधिकारी भेटू लागले आहेत. चौकीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सही करण्यासाठी यापूर्वी देखील पोलिस ठाण्यात जावे लागत होते. मात्र, आता एका फेरीतच काम होत असल्याने तक्रारदारांची ससेहोलपट थांबल्याचे चित्र आहे.

चौकीतून चालणार ही कामे
पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आल्यास, गुन्हा दाखल झाल्यांनतर तो संबंधित चौकीत तपासासाठी पाठवला जातो. तक्रार अर्जाची चौकशी करणे, गुन्ह्यांचे तपास करणे, परिसरात गस्त घालणे, बीट मार्शल पाठविणे, नागरिकांना मदत उपलब्ध करणे करून देणे, अशी कामे चौकीतून चालणार आहेत.

दूरच्या चौक्यांना अदखलपात्रची मुभा
काही पोलिस ठाण्यांपासून चौकीचे अंतर खूप जास्त आहे. अशा अपवादात्मक ठिकाणी संबंधित चौक्यांना अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा प्रकरणातही चौकीतील पोलिसांनी प्रभारी अधिकर्‍यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. जेणेकरून भविष्यात होणार्‍या तक्रारी टाळल्या जातील.

यापूर्वी चौकी स्तरावर गुन्हा दाखल करून तक्रारदाराला सही करण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे लागत होते. यामध्ये तक्रादाराचा वेळ वाया जात होता. तसेच, काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकीमध्ये गुन्ह्यांचा तपास, चौकशी, गस्त अशी कामे केली जातील.
                                    -विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button