पिंपरी : शहरातील प्रदूषण दर्शविणारा फुफ्फसांचा फलक गायब | पुढारी

पिंपरी : शहरातील प्रदूषण दर्शविणारा फुफ्फसांचा फलक गायब

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील हवेचे प्रदूषण नागरिकांना समजावे म्हणून महापालिकेने पिंपरीतील डॉ. बााबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात वायू गुणवत्ता दर्शविणारा फुफ्फुसांच्या प्रतिकृतीचे बिलबोर्ड 4 जानेवारीला लावला होता. हवेतील अतीप्रदूषणामुळे पंधरा दिसताच पांढर्या रंगाचे फुफ्फसांची प्रतिकृती काळी पडली होती. त्यामुळे या चौकातील हवा अतिप्रदूषित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता तो फलक तेथून काढण्यात टाकण्यात आला आहे. फुफ्फुसांची प्रतिकृती पांढर्‍या फिल्टरपासून बनवली होती.

आपल्या श्वासावाटे परिसरातील हवा शरीरातील फुफ्फुसांमध्ये जाते. त्याच प्रकारे या प्रतिकृतीच्या मागच्या बाजूला पंखा लावला होता. त्याद्वारे हवा आत खेचली जात होती. पंख्यांच्या या हालचालींमुळे विविध स्रोतातून हवेत पसरणारे पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) हे प्रदूषक या प्रतिकृतीमध्ये गेले. दोन आठवड्यातच हवेतील अतिप्रदूषणाचे परिणाम ठळकपणे दिसून आले. फुफ्फुसाच्या प्रतिकृतीचा पांढरा रंग आधी तपकिरी व नंतर काळा पडला. महिन्याभरात तो पूर्णपणे काळपट झाला होता. त्यावरून पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हवेतील मुख्य व घातक प्रदूषके असलेल्या पीएम 2.5 आणि पीएम 10 मध्ये अनुक्रमे 70 टक्के आणि 61 टक्के एवढी मोठी वाढ मागील सहा वर्षांमध्ये झाली आहे. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. श्वसनमार्गाच्या आजारांप्रमाणे उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार आणि विविध प्रकारचे कर्करोग संभवतात. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कायमस्वरूपी असतात, ते उपचाराने बरे करता येत नाहीत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असा आवाहन पालिकेने केले आहे.

Back to top button