बावडा : दूध उत्पादकांना मकवानाचा आधार; चार्याच्या वाढत्या मागणीमुळे मिळतोय उच्चांकी दर

बावडा; पुढारी वृत्तसेवा : सध्या दूध धंद्याला चांगले दिवस आले आहेत. दुधाला समाधानकारक असा चांगला दर मिळत असल्याने उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिरवा चार्यासाठी मकवानाचा दूध उत्पादक शेतकर्यांना मोठा आधार प्राप्त झाला आहे. साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे शेतकर्यांना चारा म्हणून उपलब्ध होते; मात्र आता साखर कारखान्याचे गळीत हंगाम संपत आल्याने जनावरांना हिरवा चारा म्हणून आता मकवानाचा आधार राहणार आहे.
त्यामुळे नियोजन करून अनेक दुध उत्पादक शेतकर्यांनी मकवानाची लागवड केल्याची माहिती प्रगतशील शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली), काशिनाथ अनपट (लाखेवाडी), अतुल वाघमोडे (काटी) यांनी दिली. आगामी काळात उन्हाळ्यामध्ये होणार्या चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरव्या मकवानाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली.
मक्याचे पीक वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जाते. अवघ्या साडेतीन ते चार महिन्यात हिरव्या मकवानाची विक्री करता येत असल्याने व आगामी काळात मागणी वाढणार आहे. सध्या काढणी चालू असलेल्या हिरव्या मकवानाचा दर हा प्रतिगुंठा 1 हजार 400 ते 1 हजार 800 रुपये असा आहे, अशी माहिती शरद जगदाळे-पाटील (टणू), प्रतीक घोगरे (गणेशवाडी), दीपक गुळवे (काटी) यांनी दिली.