पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय मेरिटवरच : रामदास आठवले | पुढारी

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय मेरिटवरच : रामदास आठवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींचे बहुमत पाहूनच मेरिटवर हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे हे न्यायालयात गेले तरी त्यांना तिथेही त्यांच्या बाजूने निकाल मिळणार नाही, त्यांनी जनतेच्या न्यायालयातच जावे, असा सल्ला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

भाजपचे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी होण्यापूर्वी आठवले यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. राज्य आणि केंद्रातील भाजप आणि सहकारी मित्रांच्या सरकारच्या कामामुळेच रासने यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप भारताचे संविधान धोक्यात आणत असल्याचा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे संविधान मजबूत असून, ते कोणीच बदलू शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना देण्याचा निर्णय हा लोकशाहीचा आदर करणारा असून, निवडणूक आयोगाने शेण खाल्ले हे उद्धव ठाकरे यांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपशी युती तोडली नसती, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती, असेही आठवले म्हणाले.

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढत चुरशीची होणार नाही, असे सांगत आठवले म्हणाले, ‘मनसेने रासने यांना पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे किती काळ एकत्र राहतील हे सांगता येत नाही.’ दरम्यान, रासने यांच्या प्रचारार्थ आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आठवले यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीचा दांडेकर पूल येथून निघून दत्तवाडी, मांगीरबाबा चौकातून साने गुरुजी वसाहतमार्गे कसबा पेठ परिसरातील कागदीपुरा येथे समारोप झाला.

Back to top button