पुणे : गृहमंत्री अमित शहा यांनी खा. गिरीश बापट यांची घेतली भेट

पुणे : गृहमंत्री अमित शहा यांनी खा. गिरीश बापट यांची घेतली भेट

पुणे : गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची शनिवारी (दि. 18) भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. या वेळी उभयतांमध्ये संसदेतील विविध घटनांवर चर्चा झाल्याची माहिती बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी दिली. आरोग्याच्या कारणामुळे बापट कसबा पेठ विधानसभेच्या प्रचारापासून दूर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी बापट यांनी केसरीवाड्यात हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी बापट यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आरोग्याची विचारपूस केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, बापट यांच्या पत्नी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात गौरव बापट म्हणाले, 'अमित शहा यांनी भेट देऊन बाबांच्या आरोग्याची विचारपूस केली. देशाचे एवढे मोठे नेते आल्याने आम्हाला आनंद होत आहे. या भेटीमध्ये शहा आणि बाबा यांच्यात संसदेतील घडामोडींवर चर्चा झाली. या वेळी कसबा पेठ पोटनिवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. बाबांची तब्येत चांगली आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.'

ओंकारेश्वर मंदिरात आरती

मुठा नदीकाठी शनिवार पेठेत असलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री ओंकारेश्वराची आरती करण्यात आली. शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले असून, पुण्यातील विविध कार्यक्रमांना ते शनिवारी उपस्थित होते. महाशिवरात्रीनिमित्त ते रात्री दहा वाजून सात मिनिटांनी श्री ओंकारेश्वर मंदिरात पोहचले. त्यांच्या आगमनाच्या वेळी सनई-चौघड्यांचा गजर करण्यात आला. शहा यांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली.

आरतीनंतर करण्यात आलेल्या शंखनादाने आणि शिवभक्तांनी केलेल्या 'हर हर महादेव'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. देवस्थानतर्फे खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट आणि धनोत्तम लोणकर यांच्या हस्ते शहा यांचा सत्कार करण्यात आला. शहा यांचा ताफा रात्री सव्वादहा वाजता तेथून रवाना झाला. त्या प्रसंगी मंदिराबाहेर उपस्थित नागरिकांचे अभिवादन शहा यांनी स्वीकारले.
त्या वेळी उपस्थित नागरिकांनी 'वंदे मातरम', 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news