पुणे, खडकीसह 57 कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका एप्रिलमध्ये

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्या आहेत. या राजपत्रानुसार 30 एप्रिलपर्यंत निवडणूक घ्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. यासंदर्भात राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 2006 च्या अधिनियम 41 च्या आधारे ही निवडणूक होणार आहे. नोव्हेंबर 2021 बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून, बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. या समितीला आत्तापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली.
पुणे कॅन्टोन्मेंटसह अनेक बोर्ड महानगरपालिकेत समाविष्ट होणार असल्याच्या हलचाली सुरू होत्या.
मात्र, अचानक निवडणूक जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कारण, बोर्डातील नियमावली ही कडक असून, या नियमांमुळे अनेक समस्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहेत. नागरिकांना अपेक्षा होती की, महानगरपालिकेमध्ये गेल्यावर त्यांना आवश्यक सुविधा, सरकारी योजनांचा लाभ मिळेल तसेच बोर्डाचे नियम शिथिल होतील. परंतु, असे काहीच न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे, अशी प्रतिक्रिया पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांनी दिली.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आठ वॉर्ड असून, नोव्हेंबर 2021 मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सुरुवातीला नामनिर्देशित सदस्यही नव्हते. त्यानंतर सचिन मथुरावाला यांची संरक्षण मंत्रालयाने नियुक्ती केली. त्यांनाही दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. आता तिसर्यांदा मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणुका घ्या, असे आदेश आले.