पुणे : मुख्यमंत्रिपदासाठी विरोधी विचारांचे तळवे चाटले | पुढारी

पुणे : मुख्यमंत्रिपदासाठी विरोधी विचारांचे तळवे चाटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी विचारांचे तळवे चाटले. बाळासाहेबांसह शिवसैनिकांना धोका दिला. निवडणूक आयोगाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ करीत महत्त्वाचा निर्णय कालच दिला, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री पुण्यात मोदींवरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केली.

‘मोदी अ‍ॅट -20’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन शनिवारी पुणे शहरातील पंडित लॉन्स येथे झाले. या वेळी व्यापीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती हेती.

पंडित लॉन्सवर भाजप कार्यकर्त्यांसह नागिकांनीही अलोट गर्दी केली होती.कार्यक्रमस्थळी शहा रात्री 9 वाजता आले, त्यांनी सुमारे 35 मिनिटे भाषण केले. त्यात 10 मिनिटे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, तर 25 मिनिटे पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रचंड आवेशात व कार्यकर्त्यांना स्फुरण चढेल अशा आवेशात भाषण केले.शहा म्हणाले की, कालच आमच्या युतीला मोठा

विजय मिळाला. शिंदे साहेबांचीच शिवसेना खरी असल्याचे शिक्कामोर्तब
निवडणूक आयोगाने केले. आयोगाने दूध का दूध, पानी का पानी केले. निवडणुकीत हार-जित होतच असते पण, जे लोक धोका देतात त्यांना कधी माफ केले नाही पाहिजे. नाहीतर त्यांची हिम्मत वाढते. मी काल शिंदे यांचे भाषण ऐकले, प्रेस ऐकली, एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, धनुष्यबाण तुम्हाला मिळाला. त्यावर शिंदे म्हणाले, नाही तो त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो मी सोडवून आणला.

विश्वगुरुच्या दिशेने वाटचाल…
शहा यांनी या पुस्तकाविषयी या वेळी सांगितले की, मोदी सरकारने जे दहा वर्षांत केले ते आजवर काँग्रेसला कधीही जमले नाही. राम मंदिर, 370 कलम यासारखे निर्णय कधी होईल, असे कुणालाही वाटले नाही, ते भाजपच्या सरकारने करून दाखवले. पण, पाच दहा वर्षांत आपण विश्वगुरू बनणार नाही, त्यासाठी तीस वर्षे सत्ता द्या, तीदेखील ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत द्यावी लागेल, तरच भारतमातेला विश्वगुरू बनवता येईल.

राहुल गांधी यांना तिरंगा फडकवता आला नसता : फडणवीस
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी पदयात्रा काढत काश्मीरला गेले, तिथे तिरंगा त्यांनी फडकवला, तो फक्त भाजपचे सरकार केंद्रात असल्याने फडकवता आला. काँग्रेसच्या काळात त्यांना काश्मीरमध्ये कधीही तिरंगा फडकवता आला नाही.

मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले : शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला एक दिवस पंतप्रधान केले तर मी 370 कलम हटवून दाखवेन, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनीच पूर्ण करून दाखवले. कालच एक निर्णय झाला तो राज्यासाठी महत्त्वाचा ठरला, मी कधीही खोटे बोलत नाही. निवडणूक आयोगाने तो निर्णय खर्या- च्या बाजूने दिला.

Back to top button