पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर | पुढारी

पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली आहे. परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली आहे. ही उत्तरसूची www. mscepune. in  आणि https:// www. mscepuppss. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या 23 फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येतील. ऑनलाइन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल.

मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाइन निवेदनपत्रातील दुरुस्ती ऑनलाइनच…
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहितीप्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button