

वाडा; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतारामुळे ताप, सर्दी, खोकल्याची साथ पसरली आहे. रोजच्या रोज शेकडो रुग्ण बाधित होत असून, त्याचा अनेकांना संसर्ग होत आहे. दुसरीकडे, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत असून, रुग्णांसह नातेवाइकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसा प्रचंड ऊन आणि रात्री थंडी पडत आहे. या बदलत्या हवामानामुळे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसाला शेकडो रुग्ण बाधित होत आहेत. गाव परिसरातील दवाखाने, रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहेत. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतही रुग्णांची मोठी वर्दळ वाढली आहे. दुसरीकडे, येथे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत.
याबाबत स्थानिक डॉक्टरांकडे चौकशी केली असता हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या साथीला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे आजार वेगाने फैलावत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजच्या ओपीडी तसेच खासगी दवाखान्यांत दररोज प्रत्येकी 30 ते 35 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील रुग्णसंख्या अधिक असल्याचे सांगितले.
वाडा आरोग्य केंद्रावर अतिरिक्त बोजा
भोरगिरी, टोकवडे, डेहणे, कुडे, घोटवडी परिसरातून रुग्ण वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी येत आहेत. कुडे, डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनदेखील या भागातील रुग्ण वाडा येथे येत आहेत. त्यामुळे वाडा आरोग्य केंद्रावर त्याचा अतिरिक्त बोजा पडत आहे. परिणामी, रुग्णांना औषधांचा तुटवडा भासत आहे. त्याचा रुग्णांना व नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेवर उपचार घेणे, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, योग्य उपचार घेऊन रुग्णांनी आराम करणे गरजेचे आहे. औषधांचा तुटवडा जरी भासत आला, तरी खासगीतून औषध खरेदी करून रुग्णांना पुरवत आहोत.
– डॉ. निखिल अडकमोल, वैद्यकीय अधिकारी