शिक्रापूर : अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर | पुढारी

शिक्रापूर : अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी मागील 22 महिन्यांपासून कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पहिलवान मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर शुक्रवारी (दि. 17) कारागृहाबाहेर आले. बांदल यांच्यावर दाखल असलेल्या शिक्रापूर येथील चार व पुणे येथे दाखल असलेला एक अशा पाच गुन्ह्यांमध्ये दि. 18 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला होता.

एप्रिल 2021 मध्ये शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकार्‍यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या आरोपावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती. पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाले होते व एकूण पाच गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल होते.

या प्रकरणाशी संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयात होऊन त्यात बांदल यांचे सर्व अटक असलेल्या सहकार्‍यांना उच्च न्यायालयाने जामीन केला होता. सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून बांदल यांची सुटका झाल्याची माहिती अ‍ॅड. आदित्य सासवडे यांनी दिली.

Back to top button