बेल्हे : दिवसाढवळ्या बंगला फोडला; अडीच लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

बेल्हे : दिवसाढवळ्या बंगला फोडला; अडीच लाखांचा ऐवज लंपास

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बंद असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे लॉक तोडून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने व 18 हजारांची रोकड असा 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी लंपास केला. बेल्हे- गुंजाळवाडी (ता. जुन्नर) शिवारातील खराडीमळा येथे शुक्रवारी (दि. 17) दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली. भरदिवसा ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कल्याण-अहमदनगर महामार्गालगत खराडीमळा आहे. या मळ्यात महेंद्र सीताराम गुंजाळ यांचा बंगला आहे. शुक्रवारी (दि. 17) दुपारी 3 वाजता महेंद्र यांची पत्नी बंगल्याच्या दरवाजा लॉक करून जवळच असलेल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा मुलगाही कामानिमित्त बाहेर गेला होता. या वेळी बंगल्यात कोणीच नसल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे लॉक तोडले.

त्यानंतर बंगल्यात घुसून साहित्याची उचकापाचक केली. तसेच कपाटातून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने आणि 18 हजारांची रोकड असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. महेंद्र यांची पत्नी 4 वाजता बंगल्यात आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी महेंद्र यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार महेंद्र यांनी आळेफाटा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.

चोरटे म्हणाले, सायंकाळी माघारी येतो !
चोरटे गुंजाळ यांच्या बंगल्यात चोरी करून बाहेर पडत असताना शेजारी राहत असलेल्या आजीने त्यांना हटकले. तसेच त्यांच्या घरासमोर पडलेले लाकूड बाजूला करण्याची विनंती केली. मात्र, चोरट्यांनी आजीबाईंना सायंकाळी माघारी येत लाकूड बाजूला करतो, असे सांगून तेथून निघून गेले. दरम्यान, भरदिवसा लोकवस्तीत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button