पुणे : पराभव दिसू लागल्याने भाजप नेत्यांची तडफड | पुढारी

पुणे : पराभव दिसू लागल्याने भाजप नेत्यांची तडफड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दिसत असल्याने त्यांच्या नेत्यांची तडफड सुरू आहे. त्यामुळेच भाजपकडून राज्यासह देशपातळीवरील नेत्यांना पुण्यात आणले जात आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. यानिमित्त पुणेकरांनी भाजप नेत्यांना पेट्रोल-डिझेल एवढे महाग का? सिलिंडरवरील अनुदान बंद का केले? वेदांता फॉक्सकॉनसारख्या कंपन्या बाहेरच्या राज्यात पाठवून आमच्या नोकर्‍यांवर गदा का आणली? असे थेट प्रश्न विचारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत जगताप आणि शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

जगताप म्हणाले की, मागील पाच वर्षे गिरीश बापट यांना महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याच बापट यांना आज प्रचारात आणले जात आहे. संजय काकडे यांनी वापरलेला ’खुजली’ हा शब्दप्रयोग भाजप आणि त्याच्या समर्थकांना मान्य आहे का? याचे उत्तर द्यावे. त्यामुळे कसब्यातील जनता भाजपला नक्की धडा शिकवेल. गिरीश महाजन कसब्यात भेटीगाठी घेत आहेत.

त्यांनी गेल्या दोन दिवसांत शहरातल्या अनेक गुन्हेगारांची भेट घेतली आहे. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते आता गुन्हेगारांचा आधार घेत आहेत. त्यांनी यापुढे जाऊन पाकीटमारांची मदत घेऊ नये, म्हणजे झाले, असेही जगताप म्हणाले. संजय मोरे म्हणाले की, दिल्ली ते गल्ली सत्ता असताना कसब्याचा विकास झालेला नाही.

शहरात खड्डे वाढले आहेत. धंगेकर
यांची प्रतिमा चांगली असल्याने आज भाजप केंद्रातील नेत्यांना बोलवत आहे. फडणवीस या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. शिवसेनेची साथ आज महाविकस आघाडीसोबत आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विकास सोडून जाती-पातीची चर्चा घडून आणायची आणि निवडून यायचे, हे काम भाजप करीत आहे.

अरविंद शिंदे म्हणाले की, हक्काचा मतदारसंघ हातातून जात असल्याने भाजप नेते तडफडत आहेत. पंतप्रधान संसदेत मूळ मुद्द्यावर बोलत नाहीत, तसेच रासने करीत आहेत. प्रभाग 15 साठी 500 कोटी रुपये नेले, या पैशाचे काम काय झाले? त्यावर ते बोलत नाहीत. आजवर भिडेवाड्याचा प्रश्न का तसाच आहे? पुणेकरांची 40 टक्के सवलत का रद्द केली? याचेही उत्तर द्यावे.

महापालिकेत पराभव दिसतोय म्हणून ते निवडणुका घेत नाहीत. मात्र, कसब्यात त्यांचा पराभव निश्चित आहे. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना प्रचाराच्या मेळाव्यात आणण्यात आले. हे कितपत योग्य आहे. त्यांना आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती सुधारावी, यासाठी महाविकास आघाडी देवाकडे प्रार्थना करणार आहे. तसेच, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी देखील करणार असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

Back to top button