पुणे : मुख्यमंत्र्यांनीच केली कसबा निवडणूक प्रतिष्ठेची | पुढारी

पुणे : मुख्यमंत्र्यांनीच केली कसबा निवडणूक प्रतिष्ठेची

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणूक आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री स्वत: दोन दिवस या निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. याशिवाय बाळासाहेंबाची शिवसेना पक्षाचे शहरातील आणि ठाण्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकही कसब्यात तळ ठोकून आहेत. आमदार मुक्ता टिळक यांच्या आकस्मिक निधनाने कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. भाजप या जागेवर निवडणूक लढवीत आहे.

भाजपचे राज्यातील अनेक मंत्री आणि नेते या निवडणुकीसाठी पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतरची विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचा धक्का बसू नये, यासाठी भाजपएवढीच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षानेही या निवडणुकीत ताकद लावली आहे. पुढील आठवड्यात स्वत: मुख्यमंत्री शिंदे या प्रचारात सहभागी होणार आहेत. येत्या सोमवारी (दि. 20) मुख्यमंत्री विविध समाजांचे शहरात मेळावे घेणार आहेत.

तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्याही भेटी घेणार असल्याचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री पुण्यात येणार असून, कसबा मतदारसंघातील प्रचार रॅलीत ते सहभागी होणार आहेत. याशिवाय, स्थानिक पदाधिकार्‍यांनाही प्रचारात सक्रियरीत्या सहभागी होण्यासंबंधीचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरप्रमुख भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी पदयात्रा, प्रचार सभा आणि अगदी घरोघरी भेटी देऊन प्रचारात सहभागी झालेले आहेत. याशिवाय, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह आठ माजी नगरसेवक कसब्यात ठाण मांडून आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री स्वत: लक्ष देऊन आहेत. त्यांनी आमच्या सर्व पदाधिकार्‍यांना सक्रिय सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.
                                                           – नाना भानगिरे, शहरप्रमुख

Back to top button