पुणे : आई नव्हे, आजी-आजोबांकडे नातीचा ताबा | पुढारी

पुणे : आई नव्हे, आजी-आजोबांकडे नातीचा ताबा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षांच्या नातीची इच्छा लक्षात घेऊन जन्मदात्या आईचा नैसर्गिक पालकत्वाचा हक्क फेटाळात न्यायालयाने नातीचा ताबा आणि पालकत्व आजी-आजोबांकडेच ठेवण्याचा निर्णाय शुक्रवारी दिला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. आई मुलीला आठवड्यातून एखादा भेटून व बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकते, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

या प्रकरणातील राहुल आणि टिना यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. 2018 मध्ये त्यांनी अंजली (सर्व नावे बदललेली) नावाची मुलगी झाली. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये राहुल यांचे निधन झाले. त्यामुळे टिना यांनी अमन यांच्याशी विवाह करीत पुन्हा वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. दुसरे लग्न करीत असताना टिना आणि तिच्या पहिल्या सासू-सासर्‍यांत समजुतीचा करारनामा झाला होता. ज्यामध्ये टिना यांनी स्वखुशीने अंजलीचा ताबा, देखरेख आणि पालकत्व तिच्या सासू-सासर्‍यांकडे दिले होते, असे आजी-आजोबांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे.

करारनामा झाल्यावर काही महिन्यांनंतर टिना यांनी सासू-सासर्‍यांच्या विरोधात मुलीचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याची तक्रार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने टिना ही मुलीची जन्मदाती आई व नैसर्गिक पालक असल्याने अंजलीचा ताबा तिच्या आईला देण्याचा आदेश सासू-सासर्‍यांना दिला.

या निकालाच्या विरोधात आजी-आजोबांनी अ‍ॅड. गंधार सोनीस यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतली. मुलीचे पालकत्व, देखरेख तिचे पालन-पोषण आणि तिचा शैक्षणिक खर्च हे तिचे आजी-आजोबा करीत आहे. ते नैसर्गिक पालक नसले, तरी मुलीचा त्यांच्याकडे असलेला ताबा हा अनधिकृत आहे, असे म्हणता येणार नाही. मुलीच्या आईने ताबा मिळण्यासाठी केलेला दावा हे एक षड्यंत्र आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. सोनीस यांनी केला.

पाच वर्षीय चिमुकलीशी संवाद
सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित पाच वर्षीय चिमुकलीशी संवाद साधला. या वेळी तिची काय इच्छा आहे. तिचे भवितव्य, हित आणि तिची मानसिकता लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल फेटाळून लावला व मुलीला तिच्या आजी-आजोबांकडे राहण्याची मागणी मान्य केली.

Back to top button