चिंचवड विधानसभेत विजय तरुणांच्या हाती | पुढारी

चिंचवड विधानसभेत विजय तरुणांच्या हाती

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील सर्वांधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातील निम्मापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 2 लाख 58 हजार तरुण मतदारांच्या हातात भावी आमदाराचे भवितव्य दडले आहे. या तरुणाईचा कौल विजयासाठी महत्त्वाचा व निर्णायक ठरणार आहे.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक मैदानात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह तब्बल 26 अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी मतदान 26 फेब—ुवारीला एकूण 510 केंद्रांवर होणार आहे. पुणे शहराला खेटून असलेल्या सांगवीपासून देहूरोडजवळील किवळे-मामुर्डी, असा सुमारे 20 किलोमीटर अंतराच्या परिसरात मतदारसंघाचे क्षेत्रफळ व्यापले आहे. त्यात श्रीमंत, मध्यम व सर्वसामान्य, असे सर्वच वर्गातील नागरिकांचे वास्तव्य आहे. विशेषत: पवना नदी काठावरील दाटवस्तीमुळे मतदारसंघात सर्वांधिक 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. पुरुष 3 लाख 415 व महिला 3 लाख 1 हजार 650 तर, तृतीयपंथी 35 मतदार आहेत.

मतदारांची वयोगटांनुसार वर्गवारी केल्यास 18 ते 39 या युवा वयोगटांतील मतदारांची संख्या तब्बल 2 लाख 58 हजार 42 इतकी आहे. यंदा प्रथमच मतदार करणारे नवमतदार 4 हजार 251 आहेत. 20 ते 29 वर्षांचे 84 हजार 575 मतदार आहेत. तर, 30 ते 39 वर्षाचे सर्वांधिक 1 लाख 73 हजार 467 मतदार आहेत. पाठोपाठ 40 ते 49 वयोगटातील 1 लाख 45 हजार 950 प्रौढ मतदार आहेत. 50 ते 59 वयांचे 77 हजार 844 आणि 60 ते 69 वयांचे 48 हजार 84 ज्येष्ठ मतदार आहेत. 70 वर्षांवरील 34 हजार 799 वयोवृद्ध मतदार आहेत.
युवा मतदार निम्म्यापेक्षा अधिक असल्याने निवडणुकीत त्यांचा कौल अधिक महत्वाचा ठरणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यावसायिक, खेळाडू, कलाकार, अशा विविध आघाड्यावर युवा वर्ग कार्यरत आहे. निवडणुकीत तरूण व तरूणी यांचा कल आणि ’मूड’ कसा आहे, हे महत्वपूर्ण असणार आहे. युवा पिढी कोणत्या उमेदवारांवर प्रेम करीत मतांचा वर्षाव करणार याची उत्सुकता आहे. मतदान करून युवा मतदार चिंचवडचा नवीन लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार निवडणार आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून उपाययोजना

चिंचवड मतदारसंघातील सर्वच मतदारांनी 26 फेब्रुवारीला मतदान करावे म्हणून निवडणूक विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. विविध भागांत जाऊन पथनाट्याद्वारे जागृती केली जात आहे. तसेच, घरोघरी जाऊन व्होटर स्लीपचे वाटप केले जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मायक्रो ऑब्झरवर व स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी घरांपासून मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. अशा मतदारांना पायर्‍या चढण्याचा त्रास होऊ नये म्हणून बहुतांश मतदान केंद्र तळमजल्यावर असणार आहेत. तसेच, मतदान केंद्रावर व्हीलचेअर व रॅम्पची सोय करण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

82 हजार 885 वयस्क मतदार
वयाच्या 58 व 60 वर्षांनंतर अनेक जण निवृत्त होतात. आपले कुटुंब, मित्रमंडळी व नातेवाइकांमध्ये हे आजी, आजोबा आपला वेळ व्यतीत करतात. अशा वयस्क मतदारांची म्हणजे 60 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 82 हजार 885 इतकी आहे. तसेच, दीड लाख प्रौढ मतदार आहेत. त्यांचाही ओढा निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.
चिंचवड मतदारसंघातील वयोगटनिहाय मतदार

वय वर्ष मतदार संख्या
18 ते 19 4 हजार 251
20 ते 29 84 हजार 575
30 ते 39 1 लाख 73 हजार 467
40 ते 49 1 लाख 45 हजार 950
50 ते 59 77 हजार 844
60 ते 69 48 हजार 86
70 ते 79 हजार 870
80 वरील 9 हजार 929
एकूण 5 लाख 68 हजार 954फफ

Back to top button