पिंपरी : पालिकेच्या 'मिळकतकर भरा' अभियानास सोशल मीडियाची साथ | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या 'मिळकतकर भरा' अभियानास सोशल मीडियाची साथ

पिंपरी : नागरिकांपर्यंत शासकीय, प्रशासनाचे आवाहन पोहोचविण्यासाठी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्याच्या आग्रहातून मराठी मीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मिळकतकर भरण्यासाठी थकबाकीदारांना प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. ‘मराठी मीम माँक्स’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मीम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा पहिला टप्पा संपला असून, 21 फेब्रुवारीपासून स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. सर्जनशील कल्पना, चित्रपट, विनोद, व्यंगातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवणार्या माध्यमाचे स्थान ओळखून महापालिकेकडून सर्जनशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शोले, दीवार, दुनियादारी, सैराट आदी चित्रपटांच्या बहुचर्चित संवादातून थकीत मिळकतकर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जसे की, दीवार चित्रपटातील, आज माझ्याकडे 3 फ्लॅट, 2 बंगले, 2 दुकाने आहेत. तुझ्याकडे काय आहे? या प्रश्नाला अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, माझ्याकडे ‘प्रॉपर्टी टॅक्स’ भरल्याची पावती आहे. किंवा ‘उठा…उठा…सकाळ झाली, मिळकतकर भरण्याची वेळ झाली’ अशा नागरिकांमध्ये पोहोचलेल्या संवादातून मिम्सद्वारे मांडणी करण्यात आली आहे.

मिम्सच्या माध्यमातून कर भरण्यास प्रोत्साहन
तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर संवादाच्या परिभाषा पण बदलत राहतात. मिम्स ही या काळाची नवी परिभाषा आहे. जे एखाद्या लेखातून साध्य होऊ शकणार नाही, ते कदाचित एखादे मिम करू शकते. मिम स्पर्धा हा त्याचाच एक भाग आहे. यातून थकबाकीदार यांचा निव्वळ उपहास अभिप्रेत नाही, तर त्यातून पालिकेच्या एकूण कर प्रणालीबाबत जागृती होणे हा व्यापक उद्देश्य आहे, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

 

Back to top button