पिंपरी : ‘आरोप करण्याआधी विरोधकांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा’ : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

पिंपरी : ‘आरोप करण्याआधी विरोधकांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा' : चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी : भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघिता पाहिजे. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारधारा आहे. ते आमच्या विचारधारेशी बरोबरी करू शकत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. बावनकुळे हे त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडला आले होते.

त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, की माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सांगण्यावरून भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. चिंचवड विधानसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, आघाडीने विनंती मान्य केली नाही. मनसेने विनंती मान्य करत पाठिंबाही दिला. भाजपचे नगरसेवक विरोधी उमेदवाराचे काम उघडपणे करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सध्या असे कोणतेही वृत्त नाही. भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, जे दुखावले आहेत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करण्यात येईल. भाजपला काही गळती लागणार नाही.

शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणालो बोललो नाही. बंडखोरीशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा-तोटा कोणाला होईल, यामध्ये आम्हाला रस नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

Back to top button