कात्रज-मंतरवाडी बायपासवरील कोंडी फोडा; स्थानिक रहिवासी हैराण | पुढारी

कात्रज-मंतरवाडी बायपासवरील कोंडी फोडा; स्थानिक रहिवासी हैराण

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर पिसोळी आंबेकर चौक, हांडेवाडी, उंड्री चौक, खडीमशिन चौकात रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक हैराण झाले आहेत. बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण झाले पण विजेचे खांब रस्त्यातच उभे असल्याने रस्ता अरुंदच राहिला, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होऊन अपघातसदृश स्थिती निर्माण होते.

नवख्या वाहनचालकांचा रात्री-अपरात्री गोंधळ उडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे हवेली तालुकाध्यक्ष प्रवीण आबनावे व स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे. बायपास मार्गे अवजड वाहनांसह इतर वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे पिसोळीतील पेट्रोल पंपाच्या चौकातून वाहने यू टर्न किंवा वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पदपथ आणि पादचारी मार्ग नसल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचार्‍यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

उंड्री चौक, खडीमशिन चौक, मंतरवाडी चौक, हांडेवाडी चौकात तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वारंवार मागणी करूनही या चौकांमध्ये बसविलेले वाहतूक नियंत्रक दिवे सुरू केले जात नसल्याने व वाहतूक कोंडीच्यावेळी वाहतूक पोलिस गायब असल्याने या मार्गावर चार-तार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असतात. बुधवारी (दि.16) दिवसभर हा मार्ग ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सोसावा लागता, तर अनेक ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मार्गावर ठोस उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी आबनावे यांनी केली आहे.

चेंबर ठरतेय धोकादायक
पिसोळीतील आंबेकर चौकात दररोज तासन्तास वाहतूक कोंडी होत असून, पुढे पद्मावती मंदिर येथे मोठा उतार असून, तेथे सतत चेंबरमधून ड्रेनेजचे घाण पाणी वाहत असल्याने दुचाकी घसरते. चेंबर दुचाकीचालकांसाठी यमदूतच ठरत आहे. रात्रीच्या वेळी दिवे बंद असल्याने चेंबरचा अंदाज न आल्याने मोठी वाहने आदळतात, तर दुचाकी अपघात होत आहेत.

Back to top button