पुणे : अन्नधान्य पुरवठा करणारा भुसार बाजार

पुणे : अन्नधान्य पुरवठा करणारा भुसार बाजार
Published on
Updated on

पुणे : अन्नधान्याचा पुरवठा करण्यात गुलटेकडी मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा भुसार बाजार अग्रेसर आहे. शहरीकरण, नियमनमुक्ती तसेच ऑनलाइन बाजारपेठांच्या विस्तारानंतरही भुसार बाजाराचे महत्त्व व्यापाराच्या दृष्टीने टिकून आहे. 125 एकर क्षेत्रात पसरलेल्या बाजारात 724 गाळे असून, बाजारात दररोज 50 हून अधिक अन्नधान्य, खाद्यतेल व सुकामेवा आदींची जवळपास 154 वाहनांमधून 18 हजार 200 क्विंटलची आवक होऊन कोट्यवधींची उलाढाल होते.

बाजाराचा इतिहास…

स्वातंत्र्यापूर्वी नाना पेठ-भवानी पेठेत गूळ-भुसार बाजार चालायचा. या वेळी 55 ते 60 दुकाने होती. त्यामध्ये 30 ते 40 दुकानांमधून अन्नधान्यांची घाऊक विक्री होत होती, तर उर्वरित दुकानांमधून नारळ, सुकामेव्याची विक्री होत होती. त्या काळात सुकामेव्याला अपेक्षित मागणी नव्हती, तर अन्नधान्य, डाळी, साखर आदींना जास्त मागणी होती. राज्यासह परराज्यातून रेल्वेने माल शहरात दाखल होत होता, तर शहरात बैलगाडीने मालवाहतूक होत होती. एका गाडीत 100 ते 130 किलोची सहा पोती बसत होती.

नाना-भवानी पेठेतून स्थलांतर
1 मे 1975 रोजी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड पुणे हे मुख्य बाजार आवार म्हणून घोषित झाले. 1982 साली नाना-भवानी पेठेतून हा बाजार गुलटेकडी मार्केट यार्डात आला. त्यासाठी सहाशे गाळे उपलब्ध करून देण्यात आले. त्यांपैकी 300 ते 350 गाळे अन्नधान्याचे व इतर सुकामेवा, मसाला व अन्य साहित्यांचे आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डातील काळूबाई मंदिर परिसरातील कॉमन हॉलमध्ये फक्त गुळाचा लिलाव होत होता. या वेळी या ठिकाणी बाजार समितीने 50 दुकाने बांधली होती. 1982 मध्ये सर्व प्रकारच्या बाजाराला सुरुवात झाली. 1985 ला खर्‍या अर्थाने बाजारपेठेला गती मिळाली.

ऑनलाइन बाजारपेठांमुळे बदल
पूर्वी शेतकरी व बिच्छाईती माल घेऊन यायचे आणि तो माल व्यापारी अडतवर विकायचे व गुळाचा लिलाव व्हायचा. राज्याच्या विविध भागांतून मिरची पुण्यात व तेथून महाराष्ट्रात जात होती. आता ऑनलाइनमुळे बाजारातही मोठा बदल झाला आहे. खरेदीदार दुकानात येऊन खरेदी करण्यासह अडतदारही दुकानापर्यंत माल पोहचवत आहेत.

अन्नधान्याची 2021-22 या वर्षातील आवक व उलाढाल

अन्नधान्य आवक (क्विंटल) उलाढाल
तांदूळ 6 लाख 92 हजार 127 3744407070
गहू 6 लाख 67 हजार 930 1903600500
ज्वारी 6 लाख 11 हजार 752 2691708800
बाजरी 5 लाख 17 हजार 105 1359986150
मिरची 56 हजार 261 1118187875

नियमित केलेला शेतमाल व वर्ष

गूळ 1959
मिरची, हळद, धने 1967
अन्नधान्य 1972
सुकामेवा, तेल, तूप, साखर, चहा, मसाल्याचे
पदार्थ, राजगीरा, गव्हाचे पीठ (आटा) 2006

                                                                                                                  (संकलन : शंकर कवडे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news