कसबा राखण्यासाठी बापट मैदानात; केसरीवाड्यात कार्यकर्त्यांशी संवाद | पुढारी

कसबा राखण्यासाठी बापट मैदानात; केसरीवाड्यात कार्यकर्त्यांशी संवाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रकृतीच्या कारणामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट कसबा भारतीय जनता पक्षाकडे राखण्यासाठी अखेर मैदानात उतरले… व्हीलचेअरवरून त्यांना टिळकवाड्यातील सभागृहात आणण्यात आले अन् त्यांनीही ’चुरस-बिरस नाही, थोडी ताकद लावा, विजयाचे पेढे घेऊन मीच तुमच्याकडे येतो’, असे सांगितल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले.

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असतानाही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी आपली संपूर्ण ताकद त्यांच्या मागे लावल्याने चुरस निर्माण झाल्याची चर्चा शहरात आहे. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत राज्यपातळीवरील अनेक दिग्गजांना कसब्यात आणण्याचे नियोजन केले.

प्रकृतीमुळे आपण निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेऊ शकत नाही, असे पत्र बापट यांनी प्रसिद्धीस दिले होते, मात्र प्रयत्नांमध्ये आणखी कसूर राहायला नको म्हणून कसब्यातून तब्बल पाच वेळा आमदार झालेल्या बापट यांची प्रकृती बरी नसतानाही आज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मोटारीतून बापट यांना टिळकवाड्यात आणण्यात आले आणि मोटारीतून उतरून व्हीलचेअरने सभागृहात नेण्यात आले. त्यावेळी बापट यांच्यासमवेत पक्षाचे उमेदवार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस मुरली मोहोळ, राजेश पांडे होते आणि त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बापट स्वत: मोजकेच बोलले, पण सर्वांनी विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करणारे त्यांचे मनोगत पांडे यांनी वाचून दाखवले. या वेळी रासने, मोहोळ यांच्या व्यतिरिक्त आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, माजी खासदार प्रदीप रावत, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे, संघटन सचिव राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बापट काय म्हणाले…
मी 1968 पासून निवडणूक प्रक्रियेत आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच मी निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका भाजप पक्ष लढला. अनेक निवडणुका जिंकल्या, तर काही निवडणुका हारल्या. मात्र, संघटना मजबूत राहिली. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी अनेक वर्षे संघटनेची सेवा करण्यात धन्यता मानत आहे. हेमंत रासने यांचे काम चांगले आहे. त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची नाही. थोडी जास्त ताकद लावणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावणे गरजेचे आहे. विजय आपलाच आहे, आता मी निवडणुकीनंतर पेढा खायलाच येतो.

कार्यकत्यांचे डोळे पाणावले…
व्हीलचेअरवर बसून बापट यांचे सभागृहात आगमन झाले. बापट यांना ऑक्सिजनची नळी लावलेली होती. हाताच्या बोटाला ऑक्सिमिटर लावलेले होते. वारंवार धाप लागत असल्याचे पाहून उपस्थित महिला व काही पुरुष कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. बापट बोलत असताना संपूर्ण सभागृहातील वातावरण भावूक झाले होते.

रासने म्हणाले, खा. बापट यांनी वारंवार कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती घेतली, मार्गदर्शन केले. त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हजेरी लावल्याने आताच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. गंजपेठ-घोरपडे पेठेत विरोधक ’यही मोका है मोदी को हराना है’ अशा घोषणा देत आहेत. मोदी खूप लांब आहेत. त्यांनी बापटांच्या या कार्यकर्त्याचा पराभव करून दाखवावा, विरोधी उमेदवार आपल्या आसपासही येणार नाही.

Back to top button