मनसे, राष्ट्रवादी शहराध्यक्षांमध्ये टि्वटर वॉर सुरू असताना धंगेकर अचानक मनसे कार्यालयात | पुढारी

मनसे, राष्ट्रवादी शहराध्यक्षांमध्ये टि्वटर वॉर सुरू असताना धंगेकर अचानक मनसे कार्यालयात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मनसेकडून दोन वेळा कसबा पेठेत निवडणूक लढवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी मनसे शहर कार्यालयात दाखल झाले. त्यांना पाहून अवाक झालेल्या मनसे पदाधिकार्‍यांनी सावरत आपल्या जुन्या सहकार्‍याचे हसतमुखाने स्वागत करत शुभेच्छा दिल्या. कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत समाजमाध्यमांमध्ये विविध प्रकारच्या पोस्ट प्रसारित केल्या होत्या.

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत मनसे पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी पुढील आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नये, असे आदेश दिले होते. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला होता. मात्र, निवडणूक असताना शांत बसावे लागत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

या घडामोडीनंतर मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यानंतर मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यामध्ये टि्वटर वॉर सुरू आहे. दोन्ही अध्यक्ष पातळी सोडून एकमेकांवर टीका करीत आहेत. असे असताना काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास लोकमान्यनगरमध्ये असताना धंगेकर अचानक मनसे कार्यालयात पोहोचले.

या वेळी मनसे नेते अनिल शिदोरे, माजी नगरसेवक बाबू वागसकर, अ‍ॅड. किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धंगेकरांना कार्यालयात पाहून सर्वजण अवाक् झाले. मात्र, या पदाधिकार्‍यांनी सावरत धंगेकर यांचे उभे राहून स्वागत त्यांना करून शुभेच्छा दिल्या. धंगेकर यांनीही शिदोरे यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी धंगेकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेही होते.

Back to top button