पुणे : भीमा नदीचे पवित्र उगमस्थान बनले गटार | पुढारी

पुणे : भीमा नदीचे पवित्र उगमस्थान बनले गटार

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : भगवान शंकराच्या घामापासून प्रवाहित झालेल्या पवित्र भीमा नदीचे उगमस्थान सध्या गटार बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नदीचा हा उगम सिमेंटच्या भिंती बांधून बंदिस्त केला आहे. एवढेच नाही, तर या भिंती बांधताना आजूबाजूच्या घरांमधील, हॉटेल्सचे सर्व सांडपाणी थेट या उगम स्थानामध्ये सोडून दिले आहे. हे कमी म्हणून आता स्थानिक लोकांनीदेखील भीमा नदीच्या उगमाला कचराकुंडी करून टाकली आहे.

भीमा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या खेड तालुक्यातील भीमाशंकर या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या धार्मिक स्थळावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. आसाम सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपल्या संकेतस्थळावर व काही वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींमध्ये आसाममधील कामरूप डाकिनी पर्वत येथे ‘भारतातील सहाव्या ज्योतिर्लिंग‘मध्ये आपले स्वागत आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.

याच जाहिरातीमध्ये देशातील सर्व ज्योतिर्लिंग स्थळांची यादीदेखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख ’डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा फोटोही लावण्यात आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर दै. ’पुढारी’च्या वतीने भीमा नदीच्या उगमस्थानची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता वरील वास्तव समोर आले.

गेले काही वर्षांत भीमाशंकर येथे वाढते पर्यटन व शहरीकरणामुळे भीमा नदीचा उगमच धोक्यात आला आहे. त्यात फार मोठी भर सार्वजनिक बांधकाम विभागाने घातली असून, भीमाशंकरच्या जंगलात उगम होणारी ही भीमा नदी भीमाशंकर मंदिराला लागून वाहत पुढे जाते. भीमाशंकर मंदिर परिसरात भीमा नदीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात बांधकाम झाली असून, पावसाच्या पाण्याचा धोका नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन्ही बाजूने मोठ्या सिमेंटच्या भिंती बांधून नदीला बंदिस्त केला आहे.

या भिंती बांधताना लगतच्या घरांमधील, हॉटेलचे सर्व सांडपाणी थेट पाइप टाकून या उगमस्थानामध्ये सोडले आहे. त्यात स्थानिक लोकांनीदेखील या भीमा नदीच्या पवित्र उगमस्थानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा टाकून नदीला कचराकुंडी बनवली आहे. यामुळे सध्या तरी भीमा नदीचा उगम गटार झाले आहे.

भीमा अंदाजे 860 किलोमीटर प्रवाहित
खेड तालुक्यातील भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ही नदी अंदाजे 860 किलोमीटर आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

Back to top button