आनंदवार्ता ! मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना बोनस अन् पीएफ | पुढारी

आनंदवार्ता ! मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना बोनस अन् पीएफ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, वेबपोर्टल यांसह इतरही मनोरंजन क्षेत्रातील कामगारांसाठी आनंदवार्ता आहे. पडद्यामागच्या कलाकारांना कोरोना काळात विविध अडचणींना सामोरे जावे लागले. आता मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आनंदाचे दिवस आले आहेत. कामगारांना कायद्याचे पाठबळ दिले असून, याकरिता सर्वंकष मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या क्षेत्रातील कामगारांना पगार, बोनस आणि पीएफचे नियम लागू केले आहेत. शासनाने मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे कवच दिले आहे.

राज्याच्या उद्योग आणि कामगार विभागाने करमणूक क्षेत्रात निर्माते, मालक यांची जबाबदारी निश्चित करतानाच कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी बुधवारी (दि.14) एसओपी जाहीर केली. चित्रपट व मालिका निर्मात्यांकडून कलाकार व कामगारांचे मानधन थकविण्याचे प्रकार घडले होते. तसेच विविध कामगार संघटनांकडून ठराविक कलाकारांना काम देण्याची सक्ती केली जात होती. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याची मागणी केली जात होती.

यासंदर्भात 2021 पासून राज्य शासनाने निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांसह विविध घटकांची बैठक घेऊन चर्चाही केली होती. त्याप्रमाणे आता शासनाने एसओपी जाहीर केली असून, एसओपींची अंमलबजावणी करणे सर्व मालक व निर्मात्यांना बंधनकारक आहे. त्यामध्ये निर्माते, मालक, नियोक्ता किंवा कंत्राटदारांनी नियमानुसार संबंधित कामगारांना पगार, विशेष भत्ते, बोनस, भविष्य निर्वाह निधी, कामगार योजना पुरविणे यांचा समावेश केला आहे. कामगारांच्या हिताचा विचार करण्यासह निर्मात्यांच्याही समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न एसओपीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

मनोरंजन क्षेत्रासाठी मार्गदर्शक सूचना

कर्मचार्‍यांचे वेतन महिन्याच्या 7 तारखेच्या आत बँक खात्यात किंवा धनादेशाद्वारे करावे
किमान वेतन कायदा लागू करून वेतन आणि भत्त्याचा त्यात समावेश करावा
कोणत्याही कर्मचार्‍याच्या पगारातून अवैधरित्या किंवा 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपात करता कामा नये
ज्यांचा पगार 21 हजारांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे काम गरजेनुसार संपुष्टात आले असेल अशांना 8.33 टक्के किमान सेवा बोनस समाप्तीवेळी देणे बंधनकारक .
कर्मचा-यांना ओळखपत्र बंधनकारक

एसओपी कुणाला लागू होणार ?
राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका, जाहिरात विभाग, यूट्यूब, डिजिटल उद्योग (वेबसिरीज) व इतर असंघटित क्षेत्रातील विभागात काम करणारे व्यावसायिक (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक,अँक्शन अँड स्टंट दिग्दर्शक), कलावंत (अभिनेता, अभिनेत्री, सहअभिनेता, गायक, व्हॉईस एडिटर, लेखक, बालकलाकार), तंत्रज्ञ (ध्वनिमुद्रण करणे, एडिटिंग करणे, साऊंड रेकॉर्डिस्ट, हेड कॅमेरामन) आदी कलाकार, कामगार.

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना पगार, बोनस, पीएफ देण्यासंबंधी शासनाने एसओपी जाहीर केली आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र, कामगारांना दैनंदिन कामानुसार भत्ता दिला जातो. त्यांना पगार दिला जात नाही. पगार, पीएफ, बोनस कुठून देणार? कुणाला एसओपी लागू करणार हा प्रश्न आहे. त्याची अंमलबजावणी कशी करणार? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे शासनाने तज्ज्ञांना बोलावून चर्चा केली पाहिजे अन्यथा ही केवळ घोषणाच राहील.

                              – मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ.

Back to top button