पुणे : येमेनी महिलेची वाचवली द़ृष्टी; डोळ्यांच्या टीबीच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार | पुढारी

पुणे : येमेनी महिलेची वाचवली द़ृष्टी; डोळ्यांच्या टीबीच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : क्षयरोगाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो हे सर्वश्रूत आहे. मात्र, डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. पुण्यातील खासगी रुग्णालयात 21 वर्षांच्या येमेनी महिलेच्या डोळ्यातील टीबीवर (ओक्युलर टीबी) यशस्वी उपचार करण्यात आले असून, तिची दृष्टी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 21 वर्षीय क्रिस्टी डिसुझा (नाव बदलले आहे) ही येमेनची रहिवासी आहे.

ती एका लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होती. सतत ताप येणे आणि तीन महिन्यांत सुमारे 14 किलो वजन कमी झाल्यामुळे या तरुणीने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिला खूप अशक्तपणा होता आणि दैनंदिन कामे सहजपणे करू शकत नव्हती. स्थानिक रुग्णालयात उपचारही करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळू लागल्याने त्यांनी पुण्यात धाव घेतली.

सर्व तपासण्यांनंतर ऑक्युलर टीबीचे निदान झाले. यामध्ये एम क्षयरोगाच्या प्रजातींद्वारे होणारा संसर्ग डोळ्याच्या कोणत्याही भागावर दुष्परिणाम करू शकतो. डोळ्यातील क्षयरोग असल्याने नेत्रतपासणीसाठी पाठवण्यात आले. क्षयरोगाची चाचणी आणि काही रक्त तपासण्याही करण्यात आल्या. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. सुरुवातीचे औषधोपचार दिल्यावर महिला रुग्ण येमेनला परतली.

टेलीमेडिसिनसारख्या पर्यायाचा वापर करून आणि उपचारांसाठी स्थानिक डॉक्टरांशी समन्वय साधून रुग्णावर उपचार करण्यात आले. लवकर निदान झाल्यामुळे टीबी केवळ डोळ्यांपुरता मर्यादित होता आणि तो इतरत्र पसरला नव्हता. रुग्ण 3 महिन्यांनंतर भारतात परत आली आणि तिचे वजन 8 किलोने वाढले. गेल्या अडीच महिन्यांपासून रुग्णाला ताप आला नाही, असे डॉ. समर्थ शहा यांनी सांगितले.

‘वजन दिवसेंदिवस कमी होत होते. मी माझ्या दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. भारतात आल्यानंतर पुण्यातील डॉक्टरांच्या पथकाने लवकरात लवकर निदान केले. डोळ्यांत क्षयरोग झाल्याचे कळताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. टीबीने माझी दृष्टी हिरावून घेतली तर, याची चिंता सतावू लागली. पण, डॉक्टरांनी वेळोवेळी सर्व शंका दूर केल्या आणि बरे होण्यास मदत केली,’ अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

Back to top button