पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयताधारी टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड, मारामारी सुरू केली होती. किरकोळ कारणातूनही कोयत्याचा वार केला जात होता. पोलिसांनी या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला. त्याचे सकारात्मक परिणामही दिसले.
मात्र, आता पोलिसांनी कोयत्याचा बंदोबस्त करण्यासाठी जालीम उपाय शोधून काढलाय. त्यांनी आता चक्क 'कोयता' हा शब्द वापरणंच बंद केलंय. एरवी पोलिसांच्या कोम्बिंगमध्ये कोयत्यांचा ढीग पडत होता. सरळ झाडाझडती केली तरी शंभर-पन्नास कोयते कोठे जात नव्हते. मात्र, आता कोम्बिंगमधूनही कोयता हद्दपार झालाय.
पुण्याच्या गुन्हेगारीत कोयता नवीन नाही. त्याचा अनेक सराईतांनी सोयीस्कर हत्यार म्हणून वापर केला. मात्र, कोयत्याला जे काही ग्लॅमर प्राप्त झाले ते हडपसर टोळक्याच्या राड्यामुळे. ही चित्रफीत व्हायरल झाली. मग नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यावरच कोयत्याच्या बंदोबस्तासाठी धडक दिली.
त्याचवेळी नुकताच पोलिस आयुक्तांनी पदभार घेतला अन् थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयत्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी' पुणे पोलिसांना कोयताच दिसू लागला. पुढे कोठेही शहरातील गुन्ह्यात कोयत्याचा वापर झाला की, कोयता गँगने गुन्हा केला, असे म्हटले जाऊ लागले.
मग काय, ठाण्याच्या पोलिस कर्मचार्यापासून ते आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत सर्वांनीच हद्दपार मिशन 'कोयता' नावाची मोहीमच उघडली. थेट कोयता विक्रीवर निर्बंध घालून कोयता खरेदीसाठी आधारकार्डची सक्ती केली. काही ठिकाणी तर हार्डवेअरच्या दुकानावरच धाड घालून पोलिसांनी कोयते जप्त केले.
तरीदेखील गुन्ह्यातील कोयत्याचा वापर काही केल्याने कमी होताना दिसून येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आता कोणत्याच गुन्ह्यात 'कोयता' हा शब्द वापरायचा नाही असा फतवाच काढला. हा फतवा जरी लेखी नसला तरी मौखिक आहे. मग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी ज्या गुन्ह्यात कोयत्याचा वापर झाला आहे त्याला कोयता न म्हणता 'लोखंडी धारदार हत्यार' म्हणणे सुरू केले. त्याची अंमलबजावणी गुन्हा दाखल करतानादेखील केली जाऊ लागली आहे. त्यामुळे कोयता हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या जालीम उपाय योजनांची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
नुकताच प्रजाकसत्ताकदिनाच्या व जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यामध्ये 3 हजार 600 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली होती. यात प्रामुख्याने आर्म अॅक्टनुसार करण्यात आलेल्या कारवाईत 45 जणांकडून तब्बल 145 कोयते जप्त करण्यात आले होते.
त्यानंतर बुधवारी (दि.15) पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशनद्वारे पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत कारवाई करून तीन हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. महाशिवरात्र, शिवजयंती तसेच कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे ऑपरेशन राबवले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागांत स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील पथकाने तपासणी मोहीम राबविली.
गंभीर गुन्ह्यातील 521 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी पोलिसांनी नोटीस बजावली. 544 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.
बसथांबे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून एक हजार 485 वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. नियमभंग केल्याप्रकरणी 32 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. परंतु, 33 पोलिस ठाणी, गुन्हे शाखेची विविध 13 पथके यांनी आपापल्या हद्दीत कोंबिंग केले खरे. परंतु, एकाही पथकाला अन् एकाही कर्मचार्याला कोयता सापडला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.