लोकसंख्या : मृत्युदर घटल्याने तरुणांचा देश होतोय ज्येष्ठ | पुढारी

लोकसंख्या : मृत्युदर घटल्याने तरुणांचा देश होतोय ज्येष्ठ

पुणे : खंडोजी वाघे

गेल्या काही दशकांत देशात आर्थिक सधनता, चांगल्या आरोग्य सोयी आणि वैद्यकीय क्षेत्रात आलेले आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मृत्युदरात मोठी घट होत आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीवर आलेल्या नियंत्रणामुळे जन्मदर कमी होत आहे. मागील दशकभरातील साधारण लोकसंख्यावाढीचा दर 12.1 टक्के असताना ज्येष्ठांच्या लोकसंख्या वाढीचा दर मात्र 35.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

पुढील दशकभरात (2031 पर्यंत) हा दर 40.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणारा भारत देश ज्येष्ठ होताना दिसतो आहे. केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागाकडून नुकताच ‘एल्डर्ली इन इंडिया 2021’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

त्यात देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची आरोग्यविषयक आणि सामाजिक स्थिती, पुढील दहा वर्षांतील ज्येष्ठांच्या संख्येचा अंदाज आदी बाबींचा आकडेवारीनिहाय तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे.

या अहवालानुसार, देशातील एकूण लोकसंख्येत 1951 मध्ये 5.5 असलेला वाटा 2011 पर्यंत 8.6 टक्क्यांपर्यंत वाढलेला दिसून आला. 2021 पर्यंत ज्येष्ठांची लोकसंख्या 10.1 टक्के आणि 2031 पर्यंत 13.1 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

ज्येष्ठांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक

1991 पर्यंत महिला ज्येष्ठांच्या तुलनेत पुरुष ज्येष्ठांची संख्या अधिक होती. मात्र, गेल्या दोन दशकांत हे प्रमाण बदलून महिला ज्येष्ठांची संख्या वाढताना दिसत आहे. 2011 मध्ये दरहजारी ज्येष्ठ पुरुषांमागे 1033 ज्येष्ठ महिलांचे प्रमाण होते. मात्र, 2031 पर्यंत दरहजारी ज्येष्ठ महिलांचे प्रमाण 1085 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

एल्डर्ली इन इंडिया 2021 अहवालातील निष्कर्ष

आयुर्मानात महाराष्ट्रही अग्रेसर

जन्मकाळातील सर्वाधिक आयुर्मानात विशेषतः मुलांच्या आयुर्मानात केरळनंतर आणि 60 वर्षांतील आयुर्मानात पंजाबनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

Back to top button