

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ओतूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गीता नितीन पानसरे यांच्या विरुद्ध स्व:पक्षातील सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव दुसर्यांदा कायद्याच्या कचाट्यात सापडून बारगळला गेला. ठराव फेटाळण्याची ही दुसरी वेळ असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे.
मागील वर्षीसुध्दा स्व:पक्षातील सदस्यांनी सरपंच गीता पानसरे यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो देखील बेकायदेशीर ठरवला गेला होता. एकदा अविश्वास ठराव दाखल करून फेटाळला गेल्यावर पुन्हा दोन वर्षे अविश्वास ठराव दाखल करता येत नाही, असा नियम असल्याने हा अविश्वासाचा ठराव दुसर्यांदा फेटाळला गेला असल्याचे समजते.
आजच्या या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, ग्रामविकास मंत्रालय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जुन्नरचे तहसीलदार यांनी बुधवारी (दि. 15) होणारी विशेष सभा रद्द केली असल्याचे ग्रामविकास विभागाचे पत्र मंगळवारी (दि. 14) प्राप्त झाले आहे. दरम्यान स्वपक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून सरपंच गीता पानसरे या राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे.
पडद्यामागचे सूत्रदार नक्की कोण?
ओतूरच्या राजकारणाचे पडद्यामागचे सूत्रदार नक्की कोण, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला डावलल्याने पक्षावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकांमधूनही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची ही नांदी असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.