बारामती तालुक्यात 216 शाळांना कुलूप; शिक्षक गेले अधिवेशनाला | पुढारी

बारामती तालुक्यात 216 शाळांना कुलूप; शिक्षक गेले अधिवेशनाला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक संघ व शिक्षक समिती या दोन संघटनांची अधिवेशने कोकणात 15 ते 17 फेब्रुवारी यादरम्यान पार पडत आहेत. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेतील सर्व शिक्षकांना रजा मंजूर करू नयेत, कोणतीही शाळा बंद राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. परंतु, बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी (दि. 15) शाळा बंद राहिल्याचे पाहायला मिळाले. तालुक्यात 216 शाळा बंद राहिल्या. शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना सरसकट शिक्षकांना रजा कशा दिल्या गेल्या, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करीत आहेत.

राज्यात शिक्षक संघ व शिक्षक समिती या दोन मोठ्या संघटना आहेत. शिक्षक संघाचे विभाजन झालेले असले तरी त्यांचे दोन्ही गट तुल्यबळ आहेत. संघ व समितीने ऐन फेब्रुवारीत अधिवेशनांचा घाट घातला आहे. ही दोन्ही अधिवेशने कोकणात पार पडत आहेत. संघाचे रत्नागिरीला, तर समितीचे वेंगुर्ला येथे अधिवेशन होत आहे. अधिवेशनादरम्यान शाळा बंद राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश होते. परंतु, बारामतीत बुधवारी काही ठिकाणी शाळा सुरू, तर काही बंद राहिल्या.

पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ शिक्षक अधिवेशनास जाण्यासाठी रजा मंजूर केली जाईल. परंतु, एकाच शाळेवरील सर्वच्या सर्व शिक्षकांना सरसकट या रजा घेता येणार नाहीत, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी देऊनही बुधवारपासूनच शाळांना कुलूप ठोकण्यात आले. केवळ अधिवेशनासाठी जाणार्‍या शिक्षकांनीच रजा घ्यावी, असा आदेश असताना अधिवेशनाच्या नावाखाली शाळेला दांडी मारणार्‍या शिक्षकांवर कारवाई होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अधिवेशनामुळे अनेक प्रश्न उपस्थित
राज्यात शिक्षक संघटनांची ताकद मोठी आहे. सरकार कोणाचेही असो, संघटनांच्या ताकदीपुढे सरकारला नेहमीच नमते घ्यावे लागले आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. परंतु, याच कालावधीत संघटनांनी अधिवेशने आयोजित केली. मे महिन्याच्या सुटीत ही अधिवेशने घेता आली असती, भली ती थंड हवेच्या ठिकाणी घेतली असती तरी विद्यार्थ्यांचे नुकसान टळले असते. परंतु, शैक्षणिक वर्ष सुरू असतानाच अधिवेशने का घेतली जात आहेत, शासन त्यासाठी विशेष रजा कसे मंजूर करते, असे प्रश्न पालकांनी यानिमित्ताने उपस्थित केले आहेत.

बारामती तालुक्यात शिक्षक संघ व समितीचे बहुतांश शिक्षक सदस्य आहेत. शासनाने अधिवेशनासाठी विशेष रजा मंजूर केल्याने ते अधिवेशनाला गेले. परिणामी, तालुक्यातील 216 शाळा बंद राहिल्या. शिक्षकांच्या उपलब्धतेनुसार 62 शाळा सुरू ठेवल्या आहेत.

                     – संपतराव गावडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती बारामती

Back to top button