पिंपरी : निवडणूक विभागाकडून मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप | पुढारी

पिंपरी : निवडणूक विभागाकडून मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी घरोघरी जाऊन मतदारांना व्होटर स्लिप वाटण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 लाख 86 हजार जणांना स्लिप देण्यात आल्या आहेत. मतदारसंघातील तब्बल 5 लाख 68 हजार मतदारांना 20 फेबु्रवारीपर्यंत स्लिप वाटप करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. चिंचवड निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तब्बल 28 उमेदवार आपआपल्या परीने प्रचारात व्यस्त आहेत. तर, निवडणूक विभाग मतदानासाठी तयारीत व्यस्त आहे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे म्हणून विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे.

निवडणूक विभागाच्या 510 बीएलओ आणि 84 नोडल अधिकार्‍यांमार्फत मतदारांना घरपोच व्होटर स्लिप वाटप केल्या जात आहेत. मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे याबाबत ही माहिती दिली जात आहे. नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांनी व्होटर स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे. मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मतदान जनजागृतीसाठी कला पथकांमार्फत कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध हाउसिंग सोसायट्यांमधून छोट्या-छोट्या कार्यक्रम व पथनाट्याद्वारे तसेच, चार्ली चॅप्लिनच्या वेशामधील कलाकाराच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. मागील मतदानावेळी कमी संख्येने मतदान झालेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करून विशेष मोहीम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करण्यात येत आहे.

मतदानासाठी दिव्यांग, वृद्धांसाठी मदतीसाठी स्वयंसेवक
मतदारसंघात 510 मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर दिव्यागांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग, वयोवृद्ध, शारीरिकदृष्ट्या दुर्बल अशा व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी व परत जाण्यासाठी साहाय्य करण्याकरिता स्वयंसेवक नेमले जाणार आहेत.

Back to top button