पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मनसेचा भाजपला पाठिंबा | पुढारी

पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मनसेचा भाजपला पाठिंबा

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले आहे. यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहेत. मनसेचेप्रमुख राज ठाकरे नेहमी सांगतात, की जेव्हा एखादा विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, ती पोटनिवडणूक बिनविरोध करावी.

याच अनुषंगाने आज पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, एकनाथ पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, प्रभारी किशोर शिंदे आदी मनसे कार्यालय पिंपरी या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी चर्चा करून राज ठाकरे यांच्या आदेशाने चिंचवड विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात आला. सध्या तरी पक्षाचे कार्यकर्ते प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणार नसून पुढील नियोजन ठाकरे यांच्या आदेशाने केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात
आले आहे.

ठाकरे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी
विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. पतीच्या निधनाचे दुःख अजून विरलेही नसताना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आली. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन, अशा भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या.

Back to top button