किल्ले शिवनेरीवर यंदाची शिवजयंती दिमाखात होणार | पुढारी

किल्ले शिवनेरीवर यंदाची शिवजयंती दिमाखात होणार

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : किल्ले शिवनेरीवर यंदाचा रविवारी (दि. 19) होणारा शिवजयंती सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणारे या वर्षीचे ‘शिवनेरीभूषण’, ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव’ आणि ‘मरणोत्तर शिवनेरीभूषण’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

किल्ले शिवनेरी येथील शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्नर बाजार समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बेनके बोलत होते. या वेळी बाजीराव ढोले, धनेश संचेती, प्रकाश ताजणे, भाऊ कुंभार, कुमार गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, शिवजयंतीदिनी किल्ले शिवनेरीवर रविवारी (दि. 19) शिवजन्म सोहळा झाल्यानंतर शिवकुंज इमारतीमधील बालशिवाजी व जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाईल. त्यानंतर सभा होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, ‘शिवनेरीभूषण’ पुरस्कार आयर्नमॅन मंगेश चंद्रचूड कोल्हे यांना, ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव’ पुरस्कार दुर्गसंवर्धक व शिवाजी ट्रेलचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांना, तर ‘मरणोत्तर शिवनेरीभूषण’ पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज घोलप यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. तसेच, जुन्नरमध्ये बैलगाडा स्पर्धा, कुस्ती स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या सर्व कार्यक्रमांत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार बेनके यांनी या वेळी केले.

Back to top button